एसटी वाहकाला 17 रुपयांच्या अपहारप्रकरणी नोकरीवरून कमी करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पैशांचा अपहार करणार्‍या एसटी वाहकाला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने चांगलाच दणका दिला. 17 रुपयांच्या अपहारप्रकरणी वाहकाला कामावरून कमी करण्याचे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिले आहेत. एवढेच नव्हे तर कर्मचार्‍याबद्दल सहानुभूती दाखवत त्याला कामावर पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश देणार्‍या कामगार न्यायालयालाही हायकोर्टाने फटकारले आहे.

1994 साली सिन्नर ते शहादा असा प्रवास करणार्‍या दोघा प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेऊन त्यांना तिकीट न देताच 17 रुपयांचा अपहार करणार्‍या तिकीट कंडक्टरला पकडण्यात आले. त्यानंतर या तिकीट कंडक्टरला प्रशासनाच्या वतीने कामावरून कमी करण्यात आले. याविरोधात वाहकाने कामगार न्यायालयात धाव घेतली. कामगार न्यायालयाने त्याला सहानुभूती दाखवत दिलासा दिला. तसेच कामावर पुन्हा ठेवण्याचे आदेश दिले. कामगार न्यायालयाच्या या निर्णयाला एसटी प्रशासनाने औद्योगिक कोर्टात आव्हान दिले, परंतु औद्योगिक कोर्टाने कर्मचार्‍याच्या बाजूने निकाल दिल्याने एसटी प्रशासनाने हायकोर्टात धाव घेऊन या निर्णयाला आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली.

कंडक्टरकडून यापूर्वीही पैशांचा अपहार केल्याचे उघड

संबंधित कंडक्टरने 7 डिसेंबर 1992 तसेच 13 एप्रिल 2007 साली अशाच प्रकारची पैशांची अफरातफर केल्याचे एसटी प्रशासनाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने याची दखल घेऊन कामगार न्यायालयाने संबंधित कंडक्टरला कामावर रुजू करून घेण्याचे आदेश रद्दबातल केले.