
सामना प्रतिनिधी । नाशिक
मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपाध्यक्ष अमित शहा आणि माझे बोलणे झाले आहे. त्यामुळे इतरांनी कुणीही मध्ये नाक खुपसण्याची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज फटकारले.
मुंबईत आज भाजपची बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असे म्हटले तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्याचीच री ओढत भाजप हा मोठा भाऊ असल्याचेही सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी आज संभाजीनगर आणि नाशिकमधील शिवसेनेच्या पीक विमा केंद्रांना भेट दिली आणि त्यानंतर शेतकर्यांशी संवाद साधला. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी यावरून चांगलेच सुनावले.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. मुख्यमंत्री कोणाचा होणार, कोण होणार या विषयापेक्षा ज्या गोरगरीब शेतकर्यांनी आपल्याला निवडून दिले त्यांचे प्रश्न सोडवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. निवडणुका येतात आणि जातात. सत्ताही येते, जाते. सत्ता आणि मुख्यमंत्री यापेक्षा ज्या जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने आपण सत्तेवर येतो ती जनता आनंदी असणे महत्त्वाचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ग्रामीण भागात पीक विमा योजनेचा लाभ मिळाला का, उज्ज्वल योजनेचा गॅस किती घरांत पोहचला, शेतकर्यांचा सातबारा कोरा झाला का, शेतकरी कर्जमुक्त झाला का, मुख्यमंत्री कोण होणार हे शोधण्यापेक्षा या प्रश्नांची उत्तरे शोधा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.





























































