गळक्या ट्रेनमध्ये छत्री कामी आली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजय सिंह | मुंबई

पावसाच्या दिवसात प्रवास करणे म्हणजे प्रत्येकासाठी तारेवरची कसरत असते, त्यात पावसाच्या दिवसातील मुंबईचा प्रवास म्हटल्यावर गर्दीशी दोन हात करीत एक-एक पाऊल पुढे टाकीत मुंबईकर प्रवास करत असतो. यानंतर किमान बस किंवा रेल्वेमध्ये पावसाचा त्रास होणार नाही, निवांत बसून प्रवास करता येईल या आशेने मुंबईकर प्रवासाला लागतो. मात्र एका प्रवाशाला सोमवारी भर ट्रेनमध्ये पावसाचा सामना करावा लागला. रेल्वेच्या छतामधून अचानक पावसाचे पाणी बरसू लागले मात्र त्या प्रवाशाने जागा काही सोडली नाही. सरळ त्याने बॅगेतून छत्री काढली आणि ती उघडून तो सीटवर बसला.

मुंबईतील पश्चिम उपनगरात काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मालाड (प) येथील रहीवासी अॅड.विक्रम कपूर चर्चगेटला सोमवारी एकच्या सुमारास जात होते. त्यांच्या सोबत आणखी एक प्रवासी लोकलमध्ये चढला आणि रिकामी जागा पाहून सीटवर बसला. रेल्वेने मालाड सोडताच पावसाला सुरूवात झाली आणि ज्या सीटवर ती व्यक्ती बसली होती त्याच जागेवर पावसाचे पाणी छतावरून गळायला सुरूवात झाली. अचानक छतावरून पाणी गळताच त्या व्यक्तीने सरळ आपल्या हातातील छत्री उघडली मात्र आपली जागा काही सोडली नाही. हा गमतीशीर परंतु रेल्वे प्रशासनाची पोलखोल करणारा प्रकार चीड आणणारा असल्याचे दै. ‘सामना’शी बोलतांना अॅड.विक्रम कपूर यांनी सांगितले.

विक्रम पुढे म्हणाले की, ती व्यक्ती मालाड-सांताक्रुज पर्यंत रेल्वे डब्यामध्ये छत्री उघडून प्रवास करीत होती. या प्रकाराची दखल घेणार नाहीत तर ते मुंबईकर कसले? त्यामुळे अनेकांनी हे विनोदी दृश्य आपल्या मोबाइलमध्ये टिपले. हा प्रवासी पुढे दादर स्थानक येताच उतरून गेला.