सामना प्रतिनिधी। मुंबई
राज्यभरात सुमारे 8 हजार पॅथलॅब आहेत. अशा पॅथलॅबमुळे दररोज सुमारे एक लाख रुग्णांची फसवणूक व आर्थिक शोषण करण्यात येत आहे. मात्र या बेकायदेशीर पॅथलॅबची सरकारकडे कोणतीही अधिकृत आकडेवारी नाही. या लॅबमधून आरोग्य चाचण्यांचे चुकीचे अहवाल येत असल्याने लाखो रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे या बेकायदा पॅथलॅबवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी मंगळवारी केली.
बेकायदा पॅथलॅब प्रकरणी कारवाई करण्याबाबत लक्षवेधी सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. या लक्षवेधीवर आलेल्या लेखी उत्तरात दोषी वैद्यकीय व्यावसायिकांना शिक्षा देण्याचे अधिकार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर बोलताना सुनील प्रभू यांनी आक्षेप नोंदवर हे उत्तर बेकायदा लॅबना पाठीशी घालणारे असल्याचे सांगितले. पॅथलॅबमध्ये एम.डी. पॅथॉलॉजिस्ट तसेच डिप्लोमा इन पॅथोलॉजी असलेली व्यक्ती असणे बंधनकारक आहे. अशाच व्यक्तीने वैद्यकीय आरोग्य चाचण्यांचे अहवाल स्वाक्षरी करून द्यावेत असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. महापालिका आयुक्तांना आपल्या विभागात सर्वेक्षण करून या लॅबविषयीचा अहवाल देण्याचे आदेश देऊनही अहवाल सादर केला जात नसल्याकडे सुनील प्रभू यांनी लक्ष वेधले. बेकायदा लॅबला संरक्षण देऊन आर्थिक संगनमत करणाऱयांवर कोणती कारवाई केली? सरकारी तसेच महापालिका रुग्णालयांबाहे बोगस लॅब सुरू आहेत यावर सरकार कोणती कारवाई करणार का? अशा लॅबचे सर्वेक्षण करून पोलीसात गुन्हा दाखल करणार का, असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.
पाच डॉक्टर निलंबित, 3 डॉक्टरांवर कारवाई
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट ऍण्ड मायक्रोबायोलॉजीस्ट या संघटनेच्या तक्रारीनंतर बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या लॅबकर कारवाई करण्यात आली आहे. पाच डॉक्टरांना निलंबित करण्यात आले असून, 3 डॉक्टरांकर कारवाई सुरू आहे. पदवीधर पॅथॉलॉजीस्टची संख्या कमी असल्याने तातडीने ही पदे भरण्यासाठीची कारवाई करण्यात येईल असे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. अनधिकृत लॅब धारकांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शासकीय पॅथॉलॉजी लॅबमधील रिक्त जागा भरण्यात येतील. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कापर पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यात येईल अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.
मुंबईत 90 टक्के बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण
गोवर-रुबेला मोहिमेमध्ये मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 90 टक्के तर राज्यामध्ये 96 टक्के बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित बालकांना ही लस देण्यात येणार असून जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी,आयएपी/आयएमए, रोटरी क्लबचे सदस्य यांच्या सहाय्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
राज्यात सध्या गोवर-रुबेला हा आजार लहान मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर बळावला असून मुंबईतील एफ दक्षिण व पी उत्तर वॉर्डमध्ये या आजाराची लागण झालेली मुले आढळून आली. लहान मुलांना आजारावरील लस मिळावी यासाठी अमिन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने गोवर-रुबेला मोहिमेत 22 लाख 67 हजार 365 मुलांचे म्हणजेच 90 टक्के मुलांना लसीकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
लसीकरणामुळे एकाही बालकाचा मृत्यू नाही
मोहिमेच्या सुरुवातीला अल्पसंख्याकबहुल विभागातील शाळेत नकार देणाऱया पालकांची संख्या लक्षणीय होती, परंतु वारंवार पालक सभा घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांशी, धार्मिक व राजकीय नेत्यांशी संवाद साधून मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. उर्वरित 10 टक्के बालकांनाही ही लस देण्यासाठी मोहीम सुरू असून गोवर-रुबेलामुळे एकही बालक मृत्युमुखी पडल्याची घटना घडलेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.






























































