
सामना प्रतिनिधी । मुंबई
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सर्व जुन्यापुराण्या रेट्रोफिटेड लोकल हटवून त्या जागी सिमेन्स लोकलचा समावेश केल्याने प्रवाशांना आता अधिक मोकळ्या हवेशीर लोकलमधून प्रवास करायला मिळणार आहे. मात्र ठाणे ते वाशी पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मात्र अजूनही जुन्या रेट्रोफिटेड गाड्यांची वाहतूक आणखी काही काळ सुरूच राहणार आहे.
हार्बर मार्गावर आतापर्यंत जुन्या रेट्रोफिटेड डीसी ते एसी परावर्तन केलेल्या गाड्यांचा वावर सुरू होता. या गाड्यांचे मोटर असलेले डबे आतून बंद असल्याने दरवाजे कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय व्हायची. शिवाय या गाड्यांना आतील गरम हवा बाहेर काढणारे ब्लोअर्स नसल्याने उन्हात उकाड्याने प्रवासी हैराण व्हायचे. तसेच या गाड्यांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने त्या ताफ्यातून काढून टाकण्याची मागणी होत होती.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सध्या 40 लोकल असून या लोकलच्या 612 फेऱ्या चालविण्यात येतात. मध्य रेल्वेचा मार्ग डीसी करंटवर असताना मरून आणि पिवळ्या रंगाची रंगसंगती असलेल्या डीसी लोकलचे एसी मार्गावर धावण्यासाठी त्यांच्यात तांत्रिक बदल करण्यात आले. या रेट्रोफिटेड गाड्यांना आधीच करडा रंग देण्यात आला होता. त्यामुळे या गाड्या आणखीनच जुन्या वाटू लागल्या. अखेर त्यांना डेक्कन क्वीनप्रमाणे निळा आणि पिवळा रंग देण्यात आला. तरी आयुर्मान संपलेल्या या गाड्या हार्बरवर सुरू होत्या. त्यात रेल्वे बोर्डाचे सदस्य रोलिंग स्टॉक राजेश अग्रवाल यांनी हार्बरवर सर्व आलबेल असून एकही जुनी गाडी धावत नसल्याचे मुंबई भेटीत पत्रकार परिषदेत सांगितल्याने प्रसारमाध्यमातून खूपच टीका करण्यात आली होती. त्यानंतर या रेट्रोफिटेड गाड्या काढून टाकण्यात आल्या.
…तर हार्बरच्या फेऱ्या वाढविणे शक्य
हार्बर मार्गावर मानखुर्दपर्यंत दर ताशी 80 कि.मी. वेगाच्या पुढे गाड्या चालविणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य नसल्याने 110 कि.मी.वेगाने धावणाऱ्या बम्बार्डिअर गाडयांना हार्बरवर चालविणे सध्या वेगाचे निर्बंध असल्याने थेट नव्या बम्बार्डिअर धावणे सध्या तरी अशक्य आहे. परंतु मुख्य मार्गावर जशा नव्या लोकल येतील तशा सिमेन्सची संख्या वाढून ट्रान्स हार्बरच्याही जुन्या लोकट हटविल्या जाणार आहेत. सिमेन्स लोकलचा वेग ताशी 80 ते 100 कि.मी. असला तरी हार्बरचा मार्ग उन्नत आणि जुना असल्याने 80 च्या पुढे गाडी चालवू शकत नाही. तरी रेट्रोफिटेडपेक्षा सिमेन्स पटकन वेग पकडत असल्याने दोन स्थानकांमधील अंतर कमी वेळात पार करणे शक्य होणार आहे. दिवसभरात एक लोकल साधारणपणे दहा फेऱ्या पूर्ण करते. यामुळे वेळापत्रकाची चाचपणी करून हार्बरवर फेऱ्या वाढवण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.



























































