
सामना ऑनलाईन । मुंबई
चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मुंबई-ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनच्या जलधारांनी बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबई-ठाण्यात मान्सून दाखल झाल्याची शुभवार्ता वेधशाळेकडून देण्यात आली होती. मात्र ही अमृतधार बरसण्यास गुरुवारची रात्र उजाडली. शुक्रवारी पहाटेपासून मुंबई-ठाणे-कल्याण-नवी मुंबई-कोकण याभागांमध्ये पावसाने जोर धरला असून मुंबई-ठाणेकर जलधारांमुळे सुखावले आहेत. तर कोकणात मात्र चांगला पाऊस झाला असून अनेक भागांना पावसाने झोडपलं आहे. रत्नागिरीत तर काही सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दक्षिण मुंबई आज पहाटेपासून पावसाने आपला जोर दाखवण्यास सुरुवात केली. चर्चगेट परिसरात वाऱ्यासह पाऊस सुरू होता. पश्चिम उपनगरातील अंधेरी, गोरेगाव, मालाड, जोगेश्वरी, बोरिवली तर पूर्व उपनगरातील मुलुंड, घाटकोपर, विक्रोळी या भागात पावसाने चांगली हजेरी लावली. ठाणे शहरासह कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.
दरम्यान, पावसाचे आगमन आणि रेल्वेचे वेळापत्रक बिघडणे समीकरण ठरलेलेच आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू होती.
पाहा फोटो: रत्नागिरीत मुसळधार पावसानंतर काही भागात पाणी साचले

























































