
सामना प्रतिनिधी । मुंबई
ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन, त्यांचा अनुभव व त्यांनी व्यथित केलेला जीवनकाळ हा भावी तरुणाईला अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. त्यांचे खडतर जीवन त्यांना उतारवयात सुलभतेने, सुखाने जगता यावे यासाठी त्यांना कोणत्या सुविधा, सवलती देता येतील याचा विचार सरकारने करावा. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजनांसाठी 27 जूनपासून आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी आवश्यक योजना जाहीर करा, अशी मागणी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी आज केली.
औचित्याच्या मुद्द्याद्वारे मंगेश कुडाळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध मागण्या केल्या. महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी 20 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठीची वयोमर्यादा 65 वरून 60 करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिक धोरणाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, श्रावणबाळ वार्धक्य निवृत्तीवेतन हे केरळ, गोवा, तेलंगणा राज्याप्रमाणे वाढ करून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना किमान 3000 रुपये करण्यात यावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयुक्तालय व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा, महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात यावा, शेतकरी, शेतमजूर असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आझाद मैदानात 27 जूनपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. तरी शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या उपरोक्त मागण्यांसंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन कारवाई करावी, असे कुडाळकर म्हणाले.





























































