हिंदुस्थान सामरिक बलवान होण्यासाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

एकविसाव्या शतकात जागतिक वर्चस्वाकरिता अमेरिका, चीन व रशियामध्ये चुरस सुरू आहे. तथापि किमान पुढची 10-15 वर्षे तरी ही आघाडी अमेरिकेच्या पुढे जाऊ शकणार नाही आणि त्याचा आनुषंगिक प्रभाव सध्याच्या ताणल्या गेलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामरिक व राजकीय संबंधांवरही पडेल.

अमेरिका सध्या एकीकडे चीनच्या विस्तारवादी धोरणाला आणि सामरिक शक्तीला वेसण घालण्यात गुंतली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या आर्थिक नाडय़ा आवळते आहे. हे दोन्ही उद्देश सफल होताना दिसत आहेत. त्याचवेळी रशिया आपल्या सामरिक शक्तीचे प्रदर्शन करण्याची धडपड करतो आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला सामरिकदृष्टय़ा बलवान होण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी अमेरिकेशी समन्वय साधून सामरिक शक्ती समतोलन धोरण (बॅलन्स ऑफ पॉवर स्ट्रटेजी) यशस्वीपणे अमलात आणावे लागेल.

स्वातंत्र्यानंतर आपले संरक्षण आणि परराष्ट्र धोरण नेहमीच सामरिक असहमती (स्ट्रटेजिक नॉन अलायन्मेंट) आणि सामरिक स्वायत्तता (स्टॅटेजिक ऑटोनॉमी) या दोन बिंदूंभोवतीच फिरत राहिले. मग ते सरकार नेहरू-गांधींचे असो अथवा काँग्रेस पुरस्कृत आघाडी सरकार असो. मागील सात दशकांपासून आपला ‘एकला चलो रे’चा नारा असल्याने 1950 च्या दशकात अमेरिका आणि रशिया (तत्कालीन सोविएत युनियन) या महासत्तांमधील शीतयुद्धातही आपण कोणाची बाजू घेण्याऐवजी असहमती आणि स्वायत्ततेचे सहजसुलभ धोरण अंगिकारले. मात्र आता या परंपरागत दृष्टिकोनात बदल होताना जाणवत आहे. मुळात जोपर्यंत हिंदुस्थान स्वतः सामरिकदृष्टय़ा बलवान होत नाही तोपर्यंत जागतिक महासत्तांमध्ये सुरू असलेल्या भौगोलिक आणि राजकीय वर्चस्वाच्या लढय़ात तो कुणाच्या खिजगणतीतही राहणार नाही हे बहुधा विद्यमान सरकारच्या लक्षात आलेले असावे. कारण त्यामुळेच हिंदुस्थानच्या परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणात काही आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत.

1990 मध्ये ज्यावेळी सोविएत युनियन दुभंगले आणि अमेरिका एकध्रुवीय महासत्ता (युनिपोलर ग्रेट पॉवर) बनली त्यावेळीदेखील हिंदुस्थानची अवस्था ‘मैं इधर जाऊं या उधर जाऊं’ अशीच राहिली. त्यामुळे हिंदुस्थानचे संरक्षण व परराष्ट्र धोरण एकप्रकारे अपंगच राहिले. त्याला जणू लकवाच मारला होता. बदलत्या भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीत आजपर्यंत अंगीकारलेल्या या असहमती/स्वायत्ततेच्या धोरणामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी नेहमी नुकसानच झाले आहे. मात्र नंतरच्या दशकात हिंदुस्थान-अमेरिकेमध्ये सामरिक समन्वय/सहकार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 21व्या शतकाच्या सुरुवातीला ही मुहूर्तमेढ रोवली गेली. 2006च्या हिंदुस्थान-अमेरिका शांततावादी आण्विक करारही झाला. मात्र एवढे होऊनही काँग्रेसच्या तत्कालीन सरकारांनी 2004 ते 2014 या दशकात सामरिक असहमती व स्वायत्तता या परंपरागत धोरणाचा त्याग केला नाही. उलट ‘सामरिक असहमती व स्वायत्तता – 2’ असे संबोधून त्याचा उदो उदो केला गेला. 2014 मध्ये देशात सत्तांतर झाल्यानंतर आणि मोदी सरकार आल्यावर मात्र या स्थितीत बदल व्हायला सुरुवात झाली. अर्थात हा काही फार लक्षणीय बदल म्हणता येणार नाही. तरीही मागील 70 वर्षांची ‘लकवामार परंपरा’ बदलण्यास प्रारंभ झाला हीच महत्त्वाची गोष्ट होती. कारण सुरुवात झाली की, मगच गोष्ट फुलायला, बहरायला लागते.

गेल्या पाच वर्षांत बरेच बदल झाले तरी जागतिक महासत्तांच्या वर्चस्वाच्या लढय़ातही अनेक स्थित्यंतरे घडली. चीन आणि रशिया सामरिक आणि आर्थिकदृष्टय़ा जवळ आले. त्यातही चीनचे विस्तारवादी आक्रमक धोरण आणि खास करून हिंदी महासागरातील चिनी नौदलाचा चंचूप्रवेश यामुळे अनेक गणिते बदलली. खास करून अमेरिकेच्या एकधृवीय जागतिक महासत्तापदाला त्यामुळे जबरदस्त हादरा बसला आहे. चीन आणि रशिया जवळ येण्यापूर्वी चीनची बाजू आर्थिक आणि सामरिकदृष्टय़ा कमकुवत होती. मात्र आज चीन-रशिया जवळ येऊनदेखील चीन व रशियाचे वर्चस्वासाठीचे एकत्रित प्रयत्न अमेरिका आणि त्याचे नाटो संघटनेतील मित्र राष्ट्र तेच इंडो पॅसिफिक भागातील अन्य मित्रदेश यांच्यापेक्षा कमकुवतच दिसून येत आहेत. त्यात अमेरिकेने चीन तसेच रशिया यांच्या समर्थक देशांवर, खास करून चीनवर ‘व्यापारयुद्ध’ लादले आहे. त्यामुळे चीन तर सैरभैर झाला आहेच, पण रशियालाही दणका बसला आहे. या व्यापारयुद्धाचा परिणाम अमेरिकेवरही होणार हे निश्चित असले तरी त्यापेक्षा जबर आघात रशिया आणि त्यातही चीनवर अधिक होईल हे स्पष्ट आहे. त्याचा दुष्परिणाम चीनच्या सामरिक ताकदीवर होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे ही परिस्थिती हिंदुस्थानसाठी पूर्ण अनुकूल आहे.

या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला आपले भविष्यातील सामरिक धोरण ठरविण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागेल. अ) नेहरू युगापासून चालत आलेल्या ‘सामरिक असहमती/स्वायत्तते’च्या धोरणाचा त्याग करून बदलत्या भौगोलिक व राजकीय परिस्थितीनुसार सामरिक धोरण निश्चित करावे लागेल. ब) मागील पाच-सहा वर्षांमध्ये अमेरिकेशी सहकार्य करण्याच्या प्रयत्नांत विद्यमान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या लहरी स्वभावानुसार जे आर्थिक/सामरिक निर्बंध आणि अडथळे आणले त्यातून पुन्हा एकदा जुन्याच सामरिक असहमती आणि स्वायत्ततेच्या धोरणाकडे वळण्याच्या प्रवृत्तीला बळी पडणे टाळावे लागेल. क) आगामी काळात जागतिक पटलावर सामरिक व आर्थिकदृष्टय़ा या महासत्तांच्या बरोबरीने येईपर्यंत हिंदुस्थानला एकटय़ाच्या जिवावर निभावून नेता येईल असे एक मध्यावधी हंगामी धोरण आखून त्यावर खंबीरपणे अंमल करावा लागेल.

अमेरिकेच्या आजपर्यंतच्या पक्षपाती मदत धोरणाच्या (बाय पार्टिसन सपोर्ट) अनुषंगाने अमेरिका-हिंदुस्थान सामरिक समन्वय आणि सहयोगाला संपूर्णतः अंगीकारण्याच्या, बळकट करण्याच्या प्रक्रियेला हिंदुस्थानला आता प्राथमिकता द्यावी लागेल. हिंदुस्थानला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी अमेरिका सर्वंकष मदत करील असे जाहीर आश्वासन (पब्लिक कमिटमेंट) डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी बराक ओबामांनी दिले होते. ट्रम्प महाशय लहरी असले तरी ओबामांनी हिंदुस्थानला दिलेल्या आश्वासनांना अमेरिका कचऱयाच्या पेटीत टाकेल असे कुठलेही उघड अथवा सुप्त संकेत अमेरिकेच्या धोरण निर्धारक समितीने (प्लॅनिंग सर्कल्स) दिलेले नाहीत. त्यामुळे हिंदुस्थान-अमेरिका परस्पर संबंधांतील कुठल्याही प्रकारच्या कुरबुरींकडे त्या तात्पुरत्या आहेत असे मानून हिंदुस्थानने सपशेल दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. निदान ‘इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी’साठी का होईना, पण अमेरिकेला हिंदुस्थानची गरज आहे. त्यामुळे ‘चीन-पाकिस्तान-रशिया त्रिकुटा’बरोबर लढा देण्यासाठी हिंदुस्थाननेदेखील अमेरिकेची मदत घेतली तर त्यात गैर काहीच नाही. अर्थात सतत बदलणाऱया जागतिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने सामरिकदृष्टय़ा बलशाली बनण्यासाठी आणि सक्षम सामरिक असहमती/स्वायत्ततेचा अंगीकार करण्यासाठी ज्या ‘अंतरिम धोरण मसुद्या’ची आवश्यकता आहे तिचा मागमूस आजही प्रत्ययाला येत नाही.

आजमितीला हिंदुस्थानवर सीमापारहून होणारे बाह्य आक्रमण तसेच पाकिस्तान आणि चीनपुरस्कृत दहशतवाद आणि नक्षलवादाची आव्हाने तोंड वासून हिंदुस्थानला गिळंकृत करण्यासाठी सज्ज आहेत. एवढेच नव्हे तर दिवसागणिक प्रभावी होत आहेत. 2004 ते 2014 या दशकादरम्यान हिंदुस्थानची सुरक्षा आणि सैन्यदलांचे आधुनिकीकरण करण्याबाबत तत्कालीन यूपीए सरकारच्या पातळीवर जी अक्षम्य व लाजिरवाणी हेळसांड झाली, त्यामुळे जागतिक स्तरावर महासत्ता बनण्याच्या हिंदुस्थानचे धोरण (स्टॅन्ड अलोन पॉलिसी) किमान दोन दशके मागे फेकले गेले, असे संरक्षण तज्ञांचे मत आहे.
एकविसाव्या शतकात जागतिक वर्चस्वाकरिता अमेरिका, चीन व रशियामध्ये चुरस सुरू आहे. तथापि किमान पुढची 10-15 वर्षे तरी ही आघाडी अमेरिकेच्या पुढे जाऊ शकणार नाही आणि त्याचा आनुषंगिक प्रभाव सध्याच्या ताणल्या गेलेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामरिक व राजकीय संबंधांवरही पडेल. अमेरिका सध्या एकीकडे चीनच्या विस्तारवादी धोरणाला आणि सामरिक शक्तीला वेसण घालण्यात गुंतली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या आर्थिक नाडय़ा आवळते आहे. हे दोन्ही उद्देश सफल होताना दिसत आहेत. त्याचवेळी रशिया अमेरिकेच्या तुलनेत आपल्या सामरिक शक्तीचे प्रदर्शन करण्याची धडपड करतो आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला सामरिकदृष्टय़ा बलवान होण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी अमेरिकेला आपल्याकडे वळवून, त्याच्याशी समन्वय साधून जागतिक स्तरावर सामरिक शक्ती समतोलन धोरण (बॅलन्स ऑफ पॉवर स्ट्रटेजी) यशस्वीपणे अमलात आणावे लागेल. सामरिक असहमती आणि सामरिक स्वायत्तता या धोरणांची भलावण करणाऱयांना ही कसरत कठीण वाटत असली तरी तेवढी ती अवघड नाही. विद्यमान केंद्र सरकार हेच धोरण सफलतापूर्वक राबवत आहे याचा आम्हा निवृत्त सैनिकांना अभिमान वाटतो.

स्ट्रटेजिक ब्लास्ट
आगामी 20 वर्षांच्या काळात हिंदुस्थानला पृथ्वीवरीलच नव्हे, तर अंतराळातील त्याच्या सुरक्षेला उत्पन्न होणाऱया धोक्यांपासूनही बचाव करण्याची सिद्धता करावी लागेल. त्यावर मात करणारी सामरिक ताकद बनण्याचा (स्ट्रटेजिक ब्लास्ट) प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपल्याला हिंदुस्थान-अमेरिका सामरिक समन्वय आणि सहकार्याचा अंगीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही. ते करताना ट्रम्परूपी किंवा अन्य तत्सम अडथळय़ांकडे दुर्लक्ष करावे लागेल. रशियाकडून खरेदी करावयाची एस-400 प्रक्षेपणास्त्र असोत, उत्तर कोरियाकडून मिळणारी संगणकीय मदत असो अथवा आपण व्हिएतनामला देऊ केलेली ब्राह्मोस क्षेपणास्त्र असोत, मोदी सरकारने या करारांची अंमलबजावणी अमेरिकेला चुचकारत यशस्वी करणे आवश्यक आहे. मोदींची कूटनीती यासंदर्भात निःसंशय सफल होईल. 2014 मध्ये पहिल्या हिंदुस्थान-अमेरिका सामरिक सहकार्य आणि समन्वयाची आणि त्यानंतर 2016मध्ये संपूर्ण सामरिक सहकार्य व समन्वयाची घोषणा झाल्यानंतर जपान, इस्रायल आणि पश्चिमी युरोपमधील देशांमध्ये हिंदुस्थानची पत प्रचंड प्रमाणात वृद्धिंगत झाली. याचा चीनला सामरिक धक्का बसला आणि दिले ते हत्यार स्वीकारणारी सोनेरी कोंबडी हातून निसटल्यामुळे रशियादेखील क्रोधित झाला हे विसरून चालणार नाही.

[email protected]