
सामना प्रतिनिधी । लातूर
जिल्हा सत्र न्यायालयाकडून निघालेल्या अटक वॉरंट मध्ये पोलीस कस्टडीत न ठेवता तात्काळ न्यायालयात हजर करण्याच्या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणार्या व तडजोडीअंती दिड हजाराची लाच स्वीकारणार्या पोलीस नाईक नारायण दत्तू गरड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे लाचेची रक्कम मिळेपर्यंत तक्रारदाराचा मोबाईल त्याने स्वतःकडे ठेवून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
सत्र न्यायालयाकडून निघालेल्या अटक वॉरंट नुसार अटक करून पोलीस कस्टडीत न ठेवता न्यायालयात हजर करण्याच्या कामासाठी गांधी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण दत्त गरड यांनी दोन हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर 1500 रुपये देण्याचे ठरले आणि ही रक्कम आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. लाचेची रक्कम मिळेपर्यंत त्यांनी तक्रारदाराचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील सापळा पोलीस निरीक्षक कुमार दराडे व त्यांच्या पथकाने लावला होता. या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.






























































