गैरवर्तन खपवून घेणार नाही, पंतप्रधान मोदी यांच्या भाजप नेत्यांना कानपिचक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आणि घमेंड खपूवन घेतली जाणार नाही. ‘मनमानी नहीं चलेगी’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचे आमदार पुत्र आकाश विजयवर्गीय यांनी काही दिवसांपूर्वी इंदूर येथे अतिक्रमणविरोधी कारवाई करायला आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱयांना बॅटने मारहाण केली होती. मारहाणीचा हा व्हिडीओ देशभर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका झाली. आकाश विजयवर्गीय यांना अटकही झाली होती. मात्र, जामिनावर सुटका झाल्यानंतरही त्यांनी पुन्हा मला ‘फलंदाजी’ करण्याची वेळ आणू नका असे वक्तव्य केले आहे.

आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. खासदारांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूर येथील घटनेचा उल्लेख न करता अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या. कोणीही गैरवर्तन, धमेंड करू नये. मनमानी नहीं चलेगी, कोणाचाही मुलगा असला तरी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी सुनावले याची माहिती सूत्रांनी दिली. चूक केली असेल तर माफी मागितली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, 6 जुलैपासून पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसी येथून भाजप सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात होईल अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. पक्ष कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथमध्ये किमान पाच झाडांचे रोपण करावे, अशी सूचना पंतप्रधानांनी केली आहे असे जोशी यांनी सांगितले.

संसदेत खासदारांच्या गैरहजेरीवर नाराज
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत सादर झाले तेव्हा भाजपचे काही खासदार गैरहजर होते. यावर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली. अधिवेशन काळात खासदारांनी हजर राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.