
सामना प्रतिनिधी । नांदेड
नांदेड जिल्हा राजकीयदृष्ट्या ताब्यात घेणाऱ्यांना मी आव्हान देतो की, अशोक चव्हाण कोणाला घाबरणार नाही. जय पराभव हा चालतच राहतो. पण जिल्हा ताब्यात घेणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे, अशा आक्रमक शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित खासदारांना हा अप्रत्यक्षरित्या लगावलेला टोला होता. पीकविमा कर्ज, शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी या प्रश्नांवर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. नांदेड तालुक्याच्या आंदोलनात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार वसंत चव्हाण, महापौर दिक्षा धबाले, माजी महापौर अब्दुल सत्तार आदी उपस्थित होते.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, फसणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल काही घेणे देणे नाही. त्यांना फक्त सत्तेचे फायदे हवे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. पण आम्ही त्यांना झोपेतून जागे करुन जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करुन अवैधरित्या त्याची तस्करी होत आहे. तसेच या जिल्ह्यातील गोरगरीबांसाठीचे स्वस्त धान्य परराज्यात अवैधरित्या पाठविले जात आहेत, याला कुणाचे पाठबळ आहे, सरकारी अधिकारी गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, जिल्ह्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचारामागे शासन आणि प्रशासन यांची मिलीभगत कारणीभूत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पीकविम्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अध्र्या शेतकऱ्यांनाही विमा मिळाला नाही. बॅकेचे कर्ज वेळेवर मिळत नाही. कर्जमाफीची घोषणा फसवी आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
अशोकराव चव्हाण आपले भाषण आटोपून भोकरच्या धरणे आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी गेले. त्यानंतर आमदार डी.पी.सावंत यांनीही सरकारवर तोंडसूख घेतले. ते म्हणाले की, हे सरकार जर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष करणार असेल तर येत्या विधानसभा निवडणुकीत सरकारचा पराभव केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही.
जुलैची चौथी तारीख उजाडली तरी पाऊस नाही, हे निदर्शनास आणून देवून डी. पी.सावंत म्हणाले की, निसर्ग सुध्दा फडणवीस सरकारच्या विरोधात आहे, असे दिसते. या सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या, परंतू त्याची अंमलबजावणी मुळीच झाली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडास फक्त घोषणांची पाने पुसली. यावर्षीच्या पीकविम्यापोटी विमा कंपन्यांनी ५८ कोटी रुपये प्रिमियम म्हणून घेतले आणि वाटप फक्त १८ कोटींचे केले.
या धरणे आंदोलनात मनपाचे सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, स्थायी समितीचे सभापती फारुख शेख, माजी सभापती शमीम अब्दुल्ला, अमित तेहरा, विलास धबाले, किशोर स्वामी यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे व पदाधिकारी उपस्थित होते.
अगोदर मोर्चा नंतर स्थगित त्यानंतर मोर्चाचे रुपांतर धरण्यात आमदार डी.पी.सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक तहसील कार्यालयावर २९ जून रोजी मोर्चा काढण्यात येईल असे जाहीर केले होते. परंतू काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीमध्ये बोलाविल्याचे कारण सांगून २९ जूनचा मोर्चा पुढे ढकलण्यात आला असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी याच मोर्चाचे रुपांतर मात्र धरणे आंदोलनात झाले. याचे कारण मात्र समजू शकले नसले तरी मोर्चाला गर्दी होणार नाही आणि आपले हसू होईल त्यामुळे तिनदा बदलेला हा कार्यक्रम अखेर धरणे आंदोलनात परिवर्तीत झाला.
एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर, दुसरीकडे फोटो सेशन
धरणे आंदोलनाचा मंडप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील या अंदाजाने केला होता. या लांबच्या लांब मंडपात आंदोलकांची संख्या कमी होती. धरणे आंदोलनास आमदार डी. पी. सावंत गंभीरपणे मार्गदर्शन करत असताना मंडपाच्या एका टोकास नगरसेवक मात्र फोटो सेशन मध्ये गर्क होते. विशेष म्हणजे या आंदोलनात शेतकरी कमी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जास्त, अशी स्थिती होती.






























































