
सामना प्रतिनिधी । मुंबई
महाराष्ट्राचा उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाड याची हिंदुस्थान अ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. हा संघ 11 जुलैपासून वेस्ट इंडिजच्या दौयावर जाणार आहे. हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने ही माहिती दिली. पृथ्वी शॉ जखमी झाल्यामुळे ऋतुराज याला ही संधी मिळाली आहे. हिंदुस्थान अ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मनीष पांडेकडे सोपवण्यात आली आहे.
22 वर्षीय ऋतुराज याने यंदाच्या मोसमात सातत्याने चमक दाखविली आहे. त्याचप्रमाणे हिंदुस्थान अ संघातील मयांक अग्रवाल व ऋषभ पंत यांची विश्वचषक स्पर्धेसाठी हिंदुस्थानी संघात वर्णी लागल्यामुळे त्यांच्या जागी अनुक्रमे अनमोलप्रीत सिंग व ईशान किशन यांना भारत अ संघात स्थान मिळाले आहे.
या संघाचे नेतृत्व मनीष पांडे करीत असून या संघात ऋतुराज गायकवाड, अनमोलप्रीत सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, राहुल चाहर, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कृणाल पांडया, दीपक चाहर, खलील अहमद, आवेश खान, नवदीप सैनी यांचा समावेश आहे. हिंदुस्थान अ संघ या दौर्यात एक दिवसाचे पाच अनधिकृत आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.




























































