तासाभराच्या पावसात व्हाइट हाऊस बुडाले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन

पावसाने सोमवारी अमेरिकेलाही झोडपले. पावसाचा मारा एवढा जोरदार होता की वॉशिंग्टन, व्हर्जिनिया आणि कोलंबियात पूर आला. एका तासात 3.3 इंच पाऊस पडला आणि त्यात व्हाइट हाऊसही बुडाले. वॉशिंग्टन आणि इतर शहरांतील सर्व मुख्य रस्ते बुडाले आहेत. दक्षिण वॉशिंग्टनमधील रेल्वे सेवा ठप्प झाली असून ती पुन्हा कधी रुळावर येईल हे प्रशासन सांगू शकत नाही. व्हाइट हाऊसच्या बेसमेंटमधील मीडिया रूममध्ये पाणी घुसले. कोलंबियातील अनेक जिह्यांतही सोमवारी रात्री उशिरापर्यंत धुवांधार पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्यांमुळे येथील विमानतळावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. बुधवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याने स्थानिक हवामान खात्याने सांगितले.

148 वर्षांचा विक्रम मोडला

अमेरिकेत झालेल्या पावसाने गेल्या 148 वर्षांचा विक्रम मोडला आहे. वॉशिंग्टन आणि व्हर्जिनिया शहराला तर अक्षरशः झोडपून काढले आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व कारभार ठप्प पडले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने आणीबाणी जाहीर केली असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकेच्या इतिहासासंदर्भातील कागदपत्रे ठेवण्यात येतात त्या नॅशनल आर्काइव्हज इमारतीमध्ये पाणी शिरल्याने कागदपत्रे वाहून गेली आहेत.