प्रवाशावर ब्लेड हल्ला करणारा अटकेत, सीएसएमटी रेल्वे पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

प्रवाशावर ब्लेडने हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे पोलिसांनी अटक केली. मनी अययर देवेंद्र असे त्याचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

घाटकोपर येथे राहणारे तक्रारदार हे गेल्या आठवडय़ात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे आले होते. तेव्हा देवेंद्रने तक्रारदाराकडून जबरदस्तीने पैसे मागण्यास सुरुवात केली. तक्रारदारांनी पैसे देण्यास नकार देताच देवेंद्रने पाकिटात ठेवलेले ब्लेड काढले व तक्रारदाराच्या मानेवर हल्ला करून तक्रारदाराकडील दोन हजार रुपये घेऊन पळ काढला. जखमी अवस्थेत पडलेल्या तक्रारदारांना पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी देवेंद्रला पी. डीमेलो रोड येथून ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले होते.