मालवणातील प्रकार : पाचशे रुपये वीज बिल येणाऱ्या ग्राहकाला बारा हजाराचा ‘शॉक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

ज्या ग्राहकाचे वीजबिल दरमहा पाचशे ते सातशे या दरम्यान येते त्या ग्राहकाला १२ हजार नऊशे रुपयांचे वीजबिल देत विजवितरणने जणू विजेचा धक्का दिला आहे. मालवण शहरातील भरड येथील दामले यांना हे बिल आले आहे.

दरम्यान, ग्राहकाने व त्यांच्या नातेवाईकांनी वीज वितरण कार्यालयाच्या पायऱ्या अनेक वेळा झिजवल्या मात्र बिल कमी करण्याबाबत दोन महिन्यात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर वीज मीटर टेस्ट करावा लागेल म्हणून ग्राहकाकडून टेस्ट फी भरणा करून घेतली. त्यालाही महिना उलटला मात्र मीटर टेस्ट करायला कोणी आलेच नाही. त्यामुळे ग्राहक हवालदिल झाले असून विजवितरणच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

मालवण शहरातील भरड येथील दामले कुटुंबियांच्या भाड्याच्या खोलीत बी. जी. गिरकर हे सेवानिवृत्त शिक्षक अनेक वर्षे राहतात. वीज मिटर अरविंद दामले यांच्या नावावर आहे. सर्वसाधारण पाचशे ते सातशे या दरम्यान त्यांचे वीजबिल येते व ते भरणाही केले जाते. मात्र २३ एप्रिल रोजी १२ हजार ९८० रुपये वीज बिल गिरकर यांच्या हाती पडले.

अचानक एवढ्या रकमेचे बिल आल्याने त्यांनी वीज वितरण कार्यालयात विचारणा केली. मात्र साहेबांना भेटा, बिल भरावे लागेल अशीच उत्तरे मिळत होती. त्यानंतर एका अधिकाऱ्यांनी मीटर टेस्ट करावा लागेल असे सांगितले. त्यासाठी १८ जून रोजी २६४ रुपये भरणा करून घेतले. मात्र महिना उलटला तरी मीटर टेस्ट झाली नाही. अथवा वीज वितरण कार्यालयातून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

मात्र पुढील दोन महिने मे व जून यांचे वीज बिल पाचशे ते हजार या पटीत आहे. पण १२ हजार ९०० हे एप्रिल महिन्याचे बिल नव्या बिलात अॅड होऊन येत आहे. त्यामुळे आता करायचे तरी काय? या विवंचनेत ग्राहक आहेत. तरी वीज वितरणने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी गिरकर यांचे जावई महेश मयेकर यांनी केली आहे.