हिंदुस्थानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विंडीजचा संघ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
west-indies-world-cup-team

सामना ऑनलाईन,गयाना

आगामी महिन्यात हिंदुस्थानविरुद्ध होणाऱया टी-20 क्रिकेट मालिकेसाठी मंगळवारी वेस्ट इंडीज संघाची घोषणा झाली. पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या या संघात सुनील नरिन व कायरॉन पोलार्ड या दोन अनुभवी अष्टपैलू खेळाडूंचे पुनरागमन झाले. मात्र, सिक्सर किंग ख्रिस गेलने देशाकडून खेळण्याऐवजी कॅनडा टी-20 लीग स्पर्धेला प्राधान्य दिले.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाच्या संघनिवड समितीचे अध्यक्ष रॉबर्ट हेन्स यांनी हा संघ जाहीर केला. याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेदरम्यान जखमी झालेला अष्टपैलू आंद्रे रसेलचीही विंडीजच्या 15 सदस्यीय संघात निवड झाली आहे. सुनील नरिनने 22 महिन्यांनंतर विंडीजच्या टी-20 संघात पुनरागमन केले. त्याने 16 सप्टेंबर 2017 रोजी इंग्लंडविरुद्ध अखेरचा टी-20 सामना खेळला होता. कार्लोस ब्रॅथवेटच्या नेतृत्वाखालील या संघात यष्टिरक्षक फलंदाज अँथनी ब्रॅम्बल या नव्या चेहऱयाला संधी देण्यात आली आहे. तो निकोलस पूरनसाठी बदली यष्टीरक्षक असेल. ख्रिस गेलने आधीच आपण निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्याच्याऐवजी डावखुरा फलंदाज जॉन कॅम्पबेलची विंडीजच्या संघात वर्णी लागली.

विंडीजचा टी-20 संघ ः कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), सुनील नरिन, कीमो पॉल, खेरी पिएरे, कायरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, जॉन कॅम्पबेल, शेल्डन कॉटरेल, शिमरॉन हेटमायर, इविन लेविस.