
सामना ऑनलाईन । सोलापूर
89 टक्के गुण मिळवून बीटेकला अॅडमिशन निश्चित केलं मात्र कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका हुशार विद्यार्थीनीने आपले जीवन संपवल्याचा दुर्दैवी प्रकार सोलापूरात घडला आहे. रुपाली रामकृष्ण पवार असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असू ती मोहोळ तालुक्यातील देगावची रहिवासी होती. रुपालीने कीटकनाशक प्राशन करुन आयुष्य संपवलं.
रुपाली रामकृष्ण पवार हिचा पंजाबच्या जालिंदर शहरातील लव्हली प्रोफेशनल अकादमीला बीटेकसाठी प्रवेश निश्चित झाला होता. या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी पात्रता परीक्षेत रुपालीने 89 टक्के गुण मिळवले होते. पंजाब इथे दहा हजार भरून रुपालीने आपला प्रवेश निश्चित केला होता. उर्वरित एक लाख रुपये भरण्यासाठी 20 जुलैची मुदत होती. मात्र मुदतीत फी भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे रुपालीने मंगळवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली.
रुपालीची फी भरण्यासाठी वडिलांनी शेती विकायला काढली होती. मात्र शेतीला कवडीमोल भाव येत असल्याने शेतीची विक्री झाली नाही. त्यामुळे अशी दुर्दैवी वेळ आल्याचं गावकरी आणि नातेवाईकांच म्हणणं आहे.




























































