
सामना प्रतिनिधी। मुंबई
घरात कोणी नसल्याचे हेरून 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शीव पोलिसांनी एका 60 वर्षीय वॉचमनला अटक केली. मकबूल अहमद खान असे या वॉचमनचे नाव आहे.
शीव परिसरातील एका सोसायटीत ती मुलगी आईवडिलांसोबत राहते. रविवारी मुलीचे आईवडील नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. त्यामुळे मुलगी एकटीच घरात होती. तिने घराच्या खिडकीतून काही कचरा बाहेर फेकला. सोसायटीच्या नियमानुसार कचरा फेकणे चुकीचे असल्याने वॉचमन त्याबाबत विचारणा करण्यासाठी मुलीच्या घरी गेला तेव्हा घरात दुसरे कोणी नव्हते. याचा गैरफायदा उचलून मकबूल खान याने तिचा विनयभंग केला. मुलीने त्याला विरोध करताच वॉचमन तेथून निघून गेला. मग चॉकलेट घेऊन मकबूल पुन्हा मुलीच्या घरी गेला आणि मुलीची समजूत काढू लागला. दरम्यान, सायंकाळी उशिरा आईवडील कामावरून घरी आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. वॉचमनचा कारनामा ऐकून पालकांनी शीव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीनुसार आम्ही मकबूल अहमद खान याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

























































