शपथविधीपूर्वी येड्डीयुरप्पांनी केला नावात बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बंगळुरू

भाजपचे बी.एस. येड्डीयुरप्पा शुक्रवारी संध्याकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. ते चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधीपूर्वी येड्डीयुरप्पांनी आपल्या नावात बदल केला आहे. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आपल्या इंग्रजी नावातल्या दोन डीमधील एक डी काढून त्याऐवजी एक आय वाढवला आहे. ज्योतिषी आणि अंकज्योतिषांच्या सल्ल्यानुसार येड्डीयुरप्पांनी आपल्या नावात बदल केल्याची चर्चा आहे.

आतापर्यंत येड्डीयुरप्पा आपले नाव B.S. Yeddyurappa असे लिहित होते. आता त्यांना शपथिवधीपूर्वी B.S. Yediyurappa असे आपले नाव केले आहे. बऱ्याच वर्षापूर्वी ते आपले नाव असेच लिहित होते. आता ते आपल्या जुन्या नावावर परतले आहेत. राजकारणाची सुरुवात करताना ते हेच नाव लिहित होते. मात्र, मुख्यमंत्रीपदी असताना अंकज्योतिषांच्याच सल्ल्याने त्यांनी नावात B.S. Yeddyurappa असा बदल केला होता. आता परत अंकज्योतिषांच्या सल्ल्याने त्यांनी जुने नाव वापरायला सुरुवात केली आहे. येड्डीयुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, याआधी ते एकदाही मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेले नाहीत. अंकज्योतिषांच्या सल्ल्याने नावात बदल केल्यावर नशीब साथ देईल अशी त्यांना आशा आहे.

येड्डीयुरप्पांनी 105 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र राज्यपालांना दिले आहे. मात्र, 31 जुलैपर्यंत त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनाही बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.