
सामना प्रतिनिधी । नगर
शिवसेना-भाजपा सरकारने राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलली. जलयुक्त शिवार अभियान अतिशय प्रभावीपणे राबवून राज्य सरकारने मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मिळालेले यश शेतकर्यांचे जीवनमान उंचावणारे ठरेल. पहिल्या पावसातच गावोगावचे बंधारे भरले आहेत. त्यामुळे लोकांच्या चेहर्यावर समाधान पहायला मिळत आहे, असे राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले. नगर तालुक्यातील चास येथे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत साकारलेला बंधारा पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. या बंधार्याचे जलपूजन औटी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
औटी पुढे म्हणाले की, आपल्या पारनेर-नगर मतदारसंघात पाच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे. नगर तालुक्यातील दुष्काळी भाग आपल्या मतदारसंघात येतो. या भागावर विशेष लक्ष केंद्रित करून जलयुक्त शिवारची अधिकाधिक कामे मंजूर केली. सर्वच कामे योग्य पध्दतीने झाली आहेत. त्याचे चांगले परिणाम आताच्या पावसाळ्यात पहायला मिळत आहे. यावेळी सरपंच अनिता गायकवाड, उपसरपंच युवराज गायकवाड, गुलाब कार्ले, राजेंद्र गावखरे, दीपक कार्ले, पोपट घोंगारडे, विलास कार्ले, अरूण गोंडाळ, केरुभाऊ देवकर, पांडुरंग देवकर, सुभाष गवळी, मारुती देवकर, बाबा टकले आदी उपस्थित होते. सरपंच अनिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच युवराज गायकवाड यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































