
सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ
दिवसेंदिवस दुष्काळाची छाया गडद होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. चाकूर तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यावर शिवपूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून प्रकल्पाशेजारील जवळपास 30 गावांना पाणीपुरवठा होतो. या प्रकल्पात आता 15 – 20 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी आहे. तरीही तलावाशेजारील शेतकरी मोटारीने अवैध पाण्याचा उपसा करीत आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्षच करीत असल्याने तलावातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या 30 गावांच्या नागरिकांनी पाण्याची धास्ती घेतली आहे.
अर्धा पावसाळा संपून गेला तरीही वडवळ नागनाथ आणि परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाही. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्याच आहेत. या भागात आता दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. घरणी मध्यम प्रकल्पातील पाणी सतरा खेडी व नऊ खेडी योजनेंतर्गत तलावाशेजारील 30 गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या प्रकल्पात आता अत्यल्प पाणीसाठा असताना, घरणी मध्यम प्रकल्पातील पाण्याचा तलावाशेजारील शेतकरी अवैध मोटारीने उपसा करीत आहेत. परिणामी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊन येत्या 15 – 20 दिवसांत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. अवैध पाणी उपसा तात्काळ बंद करण्याची नितांत गरज आहे. अवैध पाणी उपसा होत असल्यामुळे प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असून पुढील काळात पाणी टंचाई भेडसावणाची शक्यता आहे. ही बाब या प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या विविध गावच्या सरपंचानी मे महिन्यात संबंधित प्रशासनास निवेदन देऊन निदर्शनास आणली होती. यावेळी प्रशासनाने थातूरमातूर कारवाई करून दुर्लक्षच केले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. घरणी मध्यम प्रकल्पात (शिवपुर) तलावात आता केवळ 15-20 दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. ही बाब गंभीर असून तलावातील पाणीसाठा टिकून राहण्यासाठी उपलब्ध असलेले पाणी संरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केलेले पाणी तलावामध्ये टिकून राहण्यासाठी शासन स्तरावर वरिष्ठांकडून योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

























































