
सामना ऑनलाईन, मुंबई
कांदिवली स्थानकात ओव्हरहेड वायरचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. बोरिवली ते कांदिवली दरम्यान सकाळी 9.48 वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा अर्ध्या तासाहून अधिक उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना सकाळी ऐन गर्दीच्या वेळी त्रासाला सामोरे जावे लागले.
कांदिवली स्थानकात सकाळी 9.48 वाजता ओव्हरहेड वायरमध्ये स्पार्किंग होऊन तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बोरिवली लोकल अडकून पडली. अप धिम्या मार्गावरील लोकलची त्यामुळे एकामागोमाग रांगच लागली. सकाळी 10.12 वाजता ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात यश आले. परंतु या बिघाडाने बोरिवली ते कांदिवली दरम्यान तीन अप लोकल आणि बोरिवलीत चार अप लोकल खोळंबल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची सकाळी कामावर जाताना चांगलीच लटंकती झाली. धिम्या मार्गावरील लोकलना त्यामुळे एकच गर्दी झाली. जलद मार्गावर या बिघाडाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा यामुळे अर्धा तास विलंबाने धावत होत्या.






























































