
सामना प्रतिनिधी। वाढवणा बु
तेरू मध्यम प्रकल्पातून 52 गावास व वाढवणा बु., शिरूर ताजबंद, हाळी, हंडरगुळी, वाढवणा खुर्द या दाट लोकसंख्या असलेल्या गावाला या मध्यम प्रकल्पातून कायम पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र तीन – चार वर्षांपासून पाऊस होत नसल्याने प्रकल्प पूर्ण भरलेला नाही. मात्र काही गावांना व 52 खेड्यांना याच प्रकल्पातून पाणी मिळत असल्याने उपसा जास्त झाला. अर्धा पावसाळा संपत आला तरी नदी नाले भरून पूर येत नसल्याने तेरू प्रकल्प कोरडा पडला आहे. त्यामुळे गावातील पाणी पुरवठा १५ दिवस विस्कळीत होऊन बंद झाला होता. मात्र ग्रामपंचायतच्या प्रयत्नामुळे १५ दिवसानंतर पूर्ववत पाणी पुरवठा १ ऑगस्ट पासुन सुरळीत चालू झाला.
वाढवणा बु. गावातील लोकसंख्या नऊ हजारच्या जवळपास असून पाणी पुरवठा होणाऱ्या प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे १५ दिवसाने नळाला पाणी येत नसल्याने ग्रामस्थ वैतागले होते. ग्रामस्थांचे हे हाल पाहुन सरपंच सविता बामणे, उपसरपंच संगम आष्टुरे, ग्रामसेवक अरविंद शिंदे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी अप्पाराव पाटील, राजू बामणे, दत्ता गोरे, वामन केसगिरे व अन्य कर्मचारी यांना सोबत घेतले. शिंदे यांनी दिवसभर अर्धा किलोमीटर लांब चर खोदली. यामुळे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सुटला.

































































