वर्गात बलात्काराचं प्रात्यक्षिक, शिक्षकांच्या कृत्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । विजयवाडा

वर्गात शिक्षकांकडून केली जाणारी प्रात्यक्षिकं ही काही नवीन गोष्ट नाही. एखादा विषय सोपा करून समजवण्यासाठी बऱ्याच वेळा अशा प्रात्यक्षिकांची मदत घेतली जाते. पण, हैदराबाद येथे दोन शिक्षकांनी बलात्काराचं प्रात्यक्षिक दाखवल्याने खळबळ उडाली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, येथील जिल्हा शैक्षणिक मंडळाकडे एक तक्रार दाखल झाली आहे. त्या तक्रारीनुसार, एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांना पालकांच्या एका गटाने मारहाण केली. या प्रकरणाचा छडा लावताना एक धक्कादायक गोष्ट समोर आली. मंडळाकडे या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याची तक्रार दाखल झाली होती. यातील दोघे जण विद्यार्थी होते तर उर्वरित एक विद्यार्थिनी होती. ही विद्यार्थिनी जखमी झाल्याचंही समोर आलं. पण, तिच्या जखमी होण्यामागचं खरं कारण वेगळंच होतं. या तीन विद्यार्थ्यांना बलात्काराचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी निवडण्यात आलं होतं. या प्रात्यक्षिका दरम्यानच मुलगी जखमी झाली होती, असंही समोर आलं आहे.

या प्रकरणी शिक्षण मंडळाने चौकशीचे आदेश दिले आहेत. जर या प्रकरणात तथ्य आढळलं तर दोन्ही शिक्षकांवर कठोर कारवाई करणार असल्याचं शिक्षण मंडळाचं म्हणणं आहे. दुसरीकडे, अशा भयंकर प्रात्यक्षिकातून शिक्षकांना नेमकं काय साध्य करायचं होतं, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.