पेणमधील पूरग्रस्त गावांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

पेण तालुक्यातील अंतोरे, कणे, बोर्जे, वाशी, वढाव या गावातील खारबंदिस्तीची कामे लवकरच करून येथील ग्रामस्थांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करणार असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यांनी पूरग्रस्त गावांची सोमवारी पाहणी केल्यावर हे आदेश दिले आहेत. सैन्य दलाचे मेजर हिमांशू सलूजा, प्रांताधिकारी पूनम पुदलवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, महसुलचे अधिकारी, तलाठी यावेळी उपस्थित होते.

पेण तालुक्यात सर्वाधिक 493 मिमी पाऊस पडल्याने तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कणे, अंतोरे, बार्जे, वाशी, वढाव या गावांना बसला. ही गावे नदीच्या व खाडीच्या मधोमध असल्याने व खारबंदिस्तीचे नुकसान झाल्याने पूराचे पाणी गावात घुसले. त्यामुळे ही गावे पाण्याखाली गेली होती. या पूराच्या पाण्यात कणे, अंतोरे गावातील ग्रामस्थ अडकले होते. जिल्हा प्रशासनाने वेळीच पावले उचलून एनडीआरएफ व कोस्टल गार्ड यांना पाचारण करून कणे गावातील 65 जणांना सुरक्षितस्थळी हलविले. तर अंतोरे गावातील 40 ते 50 जणांना कुंडलिका रिव्हर क्राफ्टच्या रेस्क्यू टीमने सुरक्षस्थळी हलविले. या पुरामुळे या गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पाणी साचलेले आहे. घरासमोर साचलेले आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 19 किलोमीटर गावाच्या हद्दीतील खार बंदिस्ती मजबूत करा, नुकसानीचे पंचनामे लवकर करा, खारलॅन्ड वनविभागाकडे न देता ग्रामपंचायतीच्या ताब्यातच ठेवा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नुकसानीचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करा व शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत कृषी विभागाला सांगून ते पाणी कमी झाल्यानंतर त्वरित करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. खारबंदिस्तीबाबत खारलँड अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन लवकरच याबाबत निधीची पूर्तता करून काम सुरू केले जाईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

सैन्य दलाला केले पाचारण
हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट जाहीर केला आहे. एनडीआरएफ व कोस्टल गार्डची पथके जिल्ह्यात तैनात आहेत. मात्र, पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मेजर हिमांशू सलूजा यांच्या सूनेनुसार 50 जणांची तुकडी बोलावण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.