रत्नागिरीत पावसाचा कहर सुरूच; घरे, दुकाने पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून खेड,चिपळूण,रत्नागिरी,लांजा आणि राजापूराला पुराचा विळखा बसला आहे. अनेक घरे, दुकाने पाण्याखाली गेल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 181 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिवनदी, बावनदी, काजळी, अर्जुना आणि कोदवली या नद्यांना पूर आला आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.चिपळूण शहर जलमय झाले असून अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले.चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली लांबेवाडी येथे डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यात वाढ होत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

रत्नागिरीतील काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले. सोमेश्वर, टेंबेपूल आणि हातीसला पुराचा फटका बसला. हातीस येथील पीर बाबरशेख मंदिरही पाण्याखाली गेले. शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. सोमवारी सकाळी 7.45 वाजता अतिवृष्टीमुळे शीळ येथे सांडव्याच्या डाव्या बाजूकडील संधानकामध्ये बांधण्यात आलेली 70 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. तसेच सांडव्याच्या डोंगराचा भाग भूस्खलनामुळे पुच्छ कालव्याच्या बाजूने सरकत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे धरणाच्या डाव्या बाजुकडील डोंगराला भेगा जात असल्याने मातीभराव सरकण्याची शक्यता आहे. धरण सुरक्षित असून धरणास कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यात ओझरखोल येथे मुंबई गोवा महामार्गावर नुकतीच दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने राजापूर शहरात पाणी शिरले. राजापूर तालुक्यातील आडीवरे परिसरही जलमय झाला. लांजा तालुक्यात अनेक दुकानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. गुहागर तालुक्यात अबलोली ते तवसाळ मार्गावरील सुमारे 100 फूट रस्ता खचला आहे.