Article 370 सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका; राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारचा हा निर्णय संविधानाच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले. काँग्रेसने सरकारच्या निर्णयाचा विरोध केला असून राज्यसभेत या प्रस्तावाविरोधात मतदान केले होते. कलम 370 बाबत राहुल गांधी यांनी मौन सोडले असून सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. सरकारच्या संविधानविरोधी या निर्णयामुळे राष्ट्रीय सुरक्षेलाच धोका निर्माण झाला असून देश या नागरिकांमुळे बनतो, जमिनीच्या एका तुकड्याने देश बनत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना तुरुंगात डांबून संविधानाचे उल्लंघन करणारा निर्णय सरकारने घेतला आहे. जम्मू कश्मीरचे तुकडे करून राष्ट्रीय एकता साधता येणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. एवढा मोठा निर्णय घेताना सरकारने कोणालाही विश्वासात घेतले नाही. लोकप्रतिनिधी आणि जनमताला न जुमानता सरकारने मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याची टीकाही त्यांनी केली.