#Article370 अजितदादांकडून स्वागत; पवार म्हणतात, विश्वासात घ्यायला हवं होतं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्र सरकारनं सोमवारी ऐतिहासिक यश मिळवत जम्मू-कश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले. राज्यसभेमध्ये या विधेयकावर दीर्घ चर्चा झाली. यानंतर 125 विरुद्ध 61 मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आली. या विधेयकाला काही पक्षांनी पाठिंबा दर्शवला तर काहींनी याला विरोध केला आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. विविध पक्षांच्या राजकारण्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजितदादांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर पवारांनी हा निर्णय घेताना जनता आणि विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, असं म्हटले.

मंगळवारी दुपारी ट्वीट करून अजित पवार यांनी मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केलं. सरकारनं 370 कलम रद्दबातल करून चांगला आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. 18 पगड जातीचे लोक एकत्र राहावेत, देश एकसंघ राहावा म्हणून असे निर्णय घेणं गरजेचं आहे. आता पुढे खबरदारी बाळगून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या; देशभरातली जनता पाठीशी उभी राहील. यात राजकारण नको, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.

ajit-pawar

काय म्हणाले होते पवार?
‘कश्मीरची संस्कृती वेगळी असून तेथील बहुतांश जनता देशाशी निष्ठा बाळगणारी आहे. जम्मू-कश्मीरबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तेथील जनतेला व विरोधकांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असता तर अधिक चांगले झाले असते’, असे शरद पवार म्हणाले. एकामागोमाग एक ट्वीट करून त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलं आहे.