
सामना ऑनलाईन । मुंबई
बँकेतून पैसे काढताना रोकड मोजूनच काऊंटर सोडतो. अशा वेळी उशीर होत असल्यास कुणी येऊन पैसे मोजायला मदत करतो म्हणून पुढे येतात. तेव्हा सावध रहा. कारण पैसे मोजण्याच्या बहाण्याने एका जेष्ठ नागरिकाला फसवल्याची घटना समोर आली आहे.
नोटा मोजण्याचा बहाणा करून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे पवई परिसरात राहतात. गेल्या आठवड्यात ते साकीनाका जंक्शनच्या एका बँकेत गेले होते. ते बँकेतील कॅशिअर काउंटरजवळ पैसे मोजत उभे असताना एक जण त्याच्याकडे आला. त्यानंतर मैत्री वाढवत त्याने तक्रारदाराकडील पैसे मोजण्यास सुरुवात केली. पैसे मोजताना भामट्याने हातचलाखी केली. तक्रारदारांना संशय आला. त्यांनी नोटा पुन्हा मोजल्या. नोटा कमी असल्याचे त्याच्या लक्षात आले.
बँकेतून रोकड काढताना:
> रोकड काऊंटरच्या थोडं बाजूला उभी राहून मोजून घ्यावी
> त्यात काही चुकीचे आढळल्यास त्वरित काऊंटरवर सांगावे
> रोकड आपल्या हातानेच मोजावी
> रोकड जास्त असल्यास आपल्या सोबत घरातील कुणाला किंवा विश्वासार्ह व्यक्तीला सोबत घेऊन जावे
> अनोळख्या व्यक्तीची मदत टाळावी



























































