
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हद्दपार केले आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जम्मू-कश्मीरच्या विभाजनाचे विधेयक मंजूर झाले आहे. यावरून काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. काही नेत्यांनी कलम 370 ला विरोध केला आहे, तर काहींनी रोखठोक भूमिका घेत केंद्राच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. मंगळवारी हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी याला पाठिंबा दिला होता. आता आणखी एका नेत्याने केंद्राच्या निर्णयाला उघड उघड पाठिंबा दिल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिपेंद्रसिंह हुड्डा म्हणाले की, ‘आताच्या घडीला जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370ची आवश्यकता नाही असे मला वाटते. नेहरूंनी हे कलम लादलेला तेव्हा ते तात्पुरते असल्याचे म्हटले होते. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि जम्मू-कश्मीरच्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने सरकारने योग्य पाऊल उचलले आहे.’
तसेच ते पुढे म्हणाले की, मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की एवढा मोठा निर्णय घेताना सरकारने सर्व प्रमुख राजकीय पक्षांना विश्वासात घेतले पाहिजे होते. शांततेच्या मार्गाने सर्व प्रक्रिया होणे आवश्यक आहे. मला आशा आहे की सरकार यासंदर्भात योग्य आणि कठोर पाऊल उचलेल, असेही दिपेंद्रसिंह हुड्डा म्हणाले .
Deepender Singh Hooda,Congress: I would also like to add that it is the responsibility of the govt to include all the mainstream political parties in the procedure. It is necessary to begin the process in an environment of peace. I hope govt will take strong steps in this regard. https://t.co/sC8i02AWUg
— ANI (@ANI) August 7, 2019
ज्योतिरादित्य शिंदे यांचाही पाठिंबा
जम्मू-कश्मीर आणि लडाखचे हिंदुस्थानमध्ये एकीकरण करण्यासाठी सरकारने जी पावले उचललीत त्याचे मी समर्थन करतो. संवैधानिक प्रक्रियेचे पालन केले असते तर अधिक चांगले झाले असते. कोणालाही प्रश्न करायची संधी मिळाली नसती. हा निर्णय राष्ट्रहितासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया सिंधिया यांनी दिली आहे.




























































