
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्द करण्याआधी कश्मीरमधील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. पण आता जम्मूतील फुटीरतावादी नेत्यांची धरपकड करण्यात येत असून माजी मंत्री आणि डोगरा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष लाल सिंह चौधरी यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवण्याआधी कश्मीर खोऱ्यातील नेत्यांना नजरकैद करण्यात आले होते. यात माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, उमर अब्दुल्ला यांच्यासह इतर नेत्यांचाही समावेश होता. मोदी सरकार 370 कलम हटवण्याच्या विचारात असल्याची कुणकुण लागताच मुफ्ती यांच्यासह जम्मू-कश्मीरमधील अनेक फुटीरतावादी नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत स्थानिकांना सरकारविरोधात भडकावण्याचे उद्योग सुरू केले होते. यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडू नयेत यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या नेत्यांना नजरकैद करण्यात आले. त्यानंतर मोदी सरकारने आपला मोर्चा जम्मूकडे वळवला असून चौधरी यांना त्यांच्याच निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. लाल सिंह जम्मूचे असे एकमेव नेते आहेत ज्यांना पहील्यांदाच नजरकैद्येत ठेवण्यात आले आहे.


























































