
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीतील निष्काळजीपणाचा फटका यंदा 16 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसला. निकालात हे विद्यार्थी नापास झाले होते. पण पुनर्मूल्यांकनात ते उत्तीर्ण झाले. निकाल लवकर लावण्याच्या घाईगर्दीत विद्यापीठाकडून अशा चुका होत आहेत आणि त्याचा त्रास मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.
माहितीच्या अधिकारात हे उघड झाले आहे. 2016-17, 2017-18 आणि 2018-19 या शैक्षणिक वर्षात पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या आणि नंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची विषयनिहाय आकडेवारी माहिती अधिकाराद्वारे मागण्यात आली होती. गेल्या 2018-19मध्ये एकूण 49516 विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यातील 16386 विद्यार्थी पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण असल्याचे दिसून आले, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे. आर्टस् शाखेच्या 2390 विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. त्यातील जवळपास 50 टक्के विद्यार्थी नंतर उत्तीर्ण झाले. किती मोठय़ा प्रमाणात पेपर तपासणीत चुका होतात त्याचा हा पुरावा असल्याचे म्हटले जात आहे.
पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या फोटो कॉपीतून किती उत्पन्न मिळाले याचीही माहिती विद्यापीठाकडून मागितली गेली होती. पुनर्मूल्यांकनासाठी 250 रुपये तर उत्तरपत्रिकांच्या फोटो कॉपीसाठी प्रत्येक विषयाला 50 रुपये शुल्क विद्यापीठाकडून आकारले जाते. पेपर तपासणी आणि पुनर्मूल्यांकनावर विद्यापीठाचा कोटय़वधी रुपये खर्च होतो. पेपर तपासणीतील निष्काळजीपणामुळेच विद्यापीठाला हा फटका बसत आहे.
2018-19 शैक्षणिक वर्षातील पुनर्मूल्यांकनाची आकडेवारी….
विषय अर्ज केलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
- आर्टस् 2390 1021
- कॉमर्स 19614 8241
- लॉ 1655 689
- सायन्स 7860 2385
- इंजिनीयरिंग 17997 4050
विद्यापीठाला मिळालेले उत्पन्न
वर्ष पुनर्मूल्यांकन फोटो कॉपी
- 2016-17 48330490 1532055
- 2017-18 34964073 1369205
- 2018-19 23639880 677440
पेपर तपासणीसाठी मानधनावर खर्च
वर्ष खर्च
- 2014-15 22597467
- 2015-16 24483767
- 2016-17 43036301
- 2017-18 53039739
पुनर्मूल्यांकनावर झालेला खर्च
वर्ष खर्च
- 2016-17 61941100
- 2017-18 67814845
























































