
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
देशाची अर्थव्यवस्था सध्या संकटात आहे. मंदीमुळे आर्थिक विकास मंदावला आहे. मागणी आणि उत्पादन यामधील ताळमेळ साधताना उद्योजकांच्या नाकीनऊ आले आहेत. अनेक कंपन्यांना आपले उत्पादन नाइलाजास्तव काही काळासाठी थांबवावे लागले आहे. औद्योगिक उत्पादनांचा वृद्धी दर घसरून दोन टक्क्यांपर्यंत आला आहे.
अर्थव्यवस्थेची अवस्थाच बिकट बनली आहे. जून महिन्यापासून औद्योगिक विकासाचा वेग कमी होत चालला आहे. खाणकाम आणि उत्पादन क्षेत्रांमध्ये औद्योगिक उत्पादनांचा दर समाधानकारक नाही अशी आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. गेल्या वर्षीच्या जून महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर सात टक्क्यांपर्यंत वाढला होता. यावर्षीच्या जूनमध्ये तो 1.20 टक्क्यांवर आला. खाणकाम क्षेत्रातील वृद्धी दर 6.50 टक्क्यांवरून घसरून 1.60 टक्क्यांवर आला तर वीज उत्पादनातही याबाबतीत घट झाली आहे.
अर्थव्यवस्थेतील घसरणीचा फटका मोठमोठय़ा उद्योगांना बसला आहे. वाहन उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या महिंद्रा ऍन्ड महिंद्राला चालू तिमाहीमध्ये वाहनांचे उत्पादन दोन आठवडय़ांसाठी थांबवावे लागले आहे. महिंद्रा व्हेईकल्स मॅन्यूफॅक्चरर्स लिमिटेडच्या विविध उत्पादन युनिट्समधील वाहन उत्पादन थांबवण्यात आल्याच्या सूचना कंपनीने शेअर बाजारालाही दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै दरम्यान महिंद्राची देशांतर्गत वाहन विक्री आठ टक्क्याने घसरली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 1,75,329 वाहनांची विक्री झाली होती. ती यंदा 1,61,604 इतकी राहीली. निर्यातीमध्येही कंपनीला घसरण सहन करावी लागली आहे. याचा परिणाम पोलाद निर्मिती क्षेत्रावरही दिसून येत आहे. वाहन निर्मिती क्षेत्रातील चढउताराचा परिणाम पोलादाच्या मागणीवर होत असतो.

























































