
सामना प्रतिनिधी । जळकोट
मुखेड – शिरुर ताजबंद राज्य महामार्गावरील उमरगा रेतू पाटी (ता.जळकोट ) पासून जवळच 400 मीटर अंतरावर एक मालट्रक रस्ता सोडून खड्ड्यात पलटी झाल्याने अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मालट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला असून मालगाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
मॅट्रिक्स कंपनीचे झेरॉक्स पेपर घेऊन मुखेडकडून शिरुर ताजबंदच्या दिशेने निघालेला हा 10 टायर्सचा मालट्रक शनिवार दि. 10 जुलैच्या पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अपघातग्रस्त झाल्याचा अंदाज आहे. हा मालट्रक झेरॉक्स पेपरच्या बॉक्सनी खचाखच भरलेला होता. अपघात ठिकाणी झेरॉक्स पेपरचे शेकडो बॉक्स इतस्ततः पडलेले होते.
या अपघातात मालट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला असून मालट्रकचे व मालाचेही मोठे नुकसान झाले आहे. या गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मध्यरात्री झाला. मालट्रक रस्ता सोडून खाली गेल्याने या अपघाताकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. सकाळी ही घटना उमरगा रेतू येथील गावकऱ्यांच्या व रस्त्यावरुन जाणाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर दोघांचे मृतदेह मालट्रकमधून बाहेर काढण्यात आले. मृतदेह काढण्यासाठी उमरगा रेतूच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत सहकार्य केले. यासंबंधी जळकोटचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी पोलीस पोहोचले असून तपास कार्य सुरु आहे. अद्याप मृतांची ओळख पटली नसल्याचे ते म्हणाले. हा अपघात वेळीच कळला असता तर कदाचित मयतांचे प्राण वाचले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले.


























































