नदीला पूर… तीरावर दुष्काळ! पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे 63 टीएमसी पाणी वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

नदीला पूर… तीरावर दुष्काळ अशी विचित्र परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने शेती अन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे. तथापि गेल्या पंधरादिवसामध्ये 63 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडून दिल्याने वाया गेले हे पाणी कालव्यात सोडून जिल्ह्यातील उपनद्या, ओढे-नाले, बंधारे, गावतळी, शेततळी, तलाव भरून घेतली असती तर अधिकचा दिलासा मिळाला असता अजूनही वेळ गेलेली नाही उजनीच्या अतिरिक्त पाण्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे आहे.

उजनी धरण 100 टक्के भरल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेती अन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी, जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. ग्रामीण भागातून पिण्याच्या पाण्याचे टॅन्कर आणि जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची मागणी वाढते आहे. अखेर जिल्ह्यात 265 छावण्या आणि 375 पाण्याचे टॅन्कर  सुरू आहेत. एकीकडे जिल्ह्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला महापूर आला आहे आणि याच नदीतीरावरील गावामध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही अशी विचित्र परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आहे.गेल्या पंधरा दिवसामध्ये उजनीतून 63 टीएमसी पाणी भीमा नदीतून कर्नाटकमध्ये वाहून गेले. वाया घालविलेल्या या पाण्यातून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील उपनद्या, ओढे-नाले, बंधारे, गावतळी, शेततळी, तलाव भरून घेणे गरजेचे होते मात्र वेळीच नियोजन न केल्याने हक्काचे पाणी डोळ्यासमोरून वाहून गेले.

गेल्या वर्षी पाणी वाटपाचे नियोजन काटेकोरपणे न झाल्याने उजनी धरणाची पातळी वजा 59 टक्क्यावर पोहोचली होती. सुदैवाने पुणे जिल्ह्यात भरपूर पाऊस पडल्याने तळाला गेलेली धरणाची पातळी काठोकाठ भरून वाहू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसात भीमा खोऱ्यातील 15 धरणामधून 249 टीएमसी पाणी उजनी दाखल झाले त्यापैकी अतिरिक्त 63 टीएमसी पाणी भीमा नदीत सोडून दिले. आजही उजनीतून हजारो क्युसेक्स पाणी भीमा नदीत सोडून दिले जात आहे. हे पाणी कालव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. जिल्ह्यात यावर्षी फक्त 110 मिलीमीटर पाऊस झाला आहे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात याहून कमी आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. पाण्याचे वेळीच नियोजन न झाल्यास तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे.