
गृहपाठ न केल्याने चौथीतल्या मुलाला शिक्षकाने बेदम मारहाण केली आहे. ही घटना अलिबागमधील रेवदंडा हायस्कूलमध्ये घडली आहे. 13 ऑगस्टला घडलेल्या या घटनेची माहिती शिवसेनेला कळताच त्यांनी या शाळेवर धडक दिली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. पोलिसांनी मात्र या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. यामुळे पोलिसांवर संताप व्यक्त केला जात आहे.
भीमासिंह राठोड या शिक्षकाने गृहपाठ न केल्याने या विद्यार्थ्याला मारहाण केली होती. या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या पाठीवर वळ उठले आहेत. विद्यार्थ्याने घरी आल्यानंतर हा प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी ताबडतोब रेवदंडा पोलीस ठाणे गाठले आणि शिक्षकविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आधी शाळेतील मुख्यध्यापक यांच्याशी बोला असे सांगितले. यामुळे निराश झालेले पालक शाळेत गेले. शाळेत त्यांना तुमच्या मुलाने अभ्यास केला नाही म्हणून मारले असे उत्तर दिले. शाळेतूनही काही कारवाई होत नसल्याने या पालकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकांना धीर दिला आणि त्यांच्यासोबत शाळा गाठली. मुख्याध्यापकांना या प्रकरणाचा जाब विचारल्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत हा प्रकार खेदजनक असल्याचे म्हणत शिक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवले. लवकरच या शिक्षकाची बदली होईल असेही सांगण्यात आले आहे.


























































