
>> दुर्गेश आखाडे
मुंबई विद्यापीठाच्या सर्व सबसेंटरचे आता सबकॅम्पसमध्ये रुपांतर झाले आहे. कायद्याप्रमाणे त्यांची सबकॅम्पस म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आता त्या सबकॅम्पसचे नियंत्रण ठेवण्यासाठी एका संचालकांची निवड करण्यात यावी, सबकॅम्पसमध्ये पूर्णवेळ शिक्षक आणि अन्य मनुष्यबळ सरकारकडून उपलब्ध होणे गरजेचे आहे. सबकॅम्पस सक्षम होऊन काही कॅम्पससाठी जागाही उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी “दैनिक सामना”शी बोलताना व्यक्त केले. कुलगुरु सुहास पेडणेकर आज मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरीतील सबकॅम्पस बैठकीसाठी आले होते.
कुलगुरु सुहास पेडणेकर म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या सबकॅम्पसमध्ये पुर्वी आम्ही सहा महिन्याच्या करारावर आणि सध्या 11 महिन्यांच्या करारावर शिक्षक नेमतो. चांगले अध्ययन कंरण्यासाठी शिक्षकांमध्ये स्थीरता आणि आत्मविश्वास येणे गरजेचे आहे. म्हणून सरकारने पूर्णवेळ शिक्षक आणि अन्य मनुष्यबळ द्यावे तसेच या सर्व सबकॅम्पसवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक संचालक असावा अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे. कारण यापुर्वीही शिक्षकांच्या वेतनाचा भार मुंबई विद्यापीठावर पडत होता. विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क पाहीले तर ते खूप कमी असल्यामुळे त्यातून शिक्षकांच्या वेतनाचा खर्चही निघत नसल्याची खंत कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी व्यक्त केली. रत्नागिरीसाठी सबकॅम्पससाठी पुरेशी जागा असली पाहिजे, हे कॅम्पस अधिक चांगले बनविण्याकरीता आम्ही प्रयत्न करत आहोत. पालघर येथील सबकॅम्पससाठी आम्ही जागा शोधत आहेत, सिंधुदुर्ग, पालघर आणि झाराप येथील सबकॅम्पसमुळे मुंबई विद्यापीठावरचा भार कमी होईल अशी आशा कुलगुरु पेडणेकर यांनी व्यक्त केली़
समुद्रकिनाऱ्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करणार
कुलगुरु सुहास पेडणेकंर पुढे म्हणाले की, कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा ही आपली एक संपत्ती आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर आधारीत अभ्यासक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे. समुद्रातील जैवविविधता टिकवणारे अभ्यासक्रम, समुद्र संरक्षणावर आधारीत अभ्यासक्रम आणि अन्य काही अभ्यासक्रम सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात अशा अभ्यासक्रमातून नोकऱ्या उपलब्ध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये स्पोर्टस कॉम्पलेक्स उभारण्यात येणार असून विविध क्रीडाप्रकार तेथे सुरू करण्यात येणार आहेत.
रेल्वे अभ्यासक्रम कल्याणकेंद्रात यंदापासून
रेल्वेवर आधारीत अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतचा गेली अनेक वर्षे मुंबई विद्यापीठाचा रेंगाळलेला विषय यंदा मार्गी लागला आहे. कल्याण येथे स्कूल ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड अॅप्लाईड सायन्स हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून त्यामध्ये रेल्वे अभ्यासक्रमांचा समावेश असेल असे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी सांगितले.


























































