लिंक पाठवून बँक खात्यावर मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवर लिंक पाठवून तरुणाच्या बँक खात्यावर सायबर भामटय़ाने डल्ला मारल्याची घटना घडली आहे. फसवणूकप्रकरणी बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे एका खासगी कंपनीमध्ये काम करतात. त्यांना जुलै महिन्यात मोबाईलवर फोन आला होता. सायबर भामटय़ाने नोकरीची सेवा पुरवणाऱया एका कंपनीतून बोलतेय असे तक्रारदाराला सांगितले. तुम्हाला मेंबरशिप परत करायची आहे, अशा भूलथापा मारल्या. टोकन म्हणून 10 रुपये पाठवतो असे सांगून तक्रारदाराच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. पाठवलेल्या लिंकमध्ये सर्व माहिती भरण्यास सांगितली.

ती लिंक बनावट होती. त्या लिंकवर तक्रारदाराने बँक खात्याची माहिती नमूद केली. त्यानंतर डेबिट कार्ड आणि ओटीपी ( वन टाइम पासवर्ड) ची माहिती घेतली. ओटीपीची माहिती दिल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून दीड लाख रुपयावर डल्ला मारला. या घटनेनंतर तक्रारदाराने कार्ड ब्लॉक करून बँकेशी संपर्क साधला. फसवणूक झाल्याप्रकरणी त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.