स्वातंत्र्यदिनी पुरस्कार मिळालेल्या पोलिसाला दुसऱ्याच दिवशी लाच घेताना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

स्वातंत्र्य दिनी पुरस्कार मिळालेल्या पोलिसाला दुसऱ्याच दिवशी लाच घेतल्याप्रकरणी अटक झाली आहे. तिरुपती रेड्डी असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तेलंगणा राज्य पोलीस दलात रेड्डी कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे.

स्वातंत्र्य दिनी रेड्डी याला कामाप्रति समर्पित वृत्ती आणि कठोर मेहनतीसाठी सर्वोत्कृष्ट कॉन्स्टेबल पुरस्कारही मिळाला होता. तेलंगणाचे अबकारी विभागाचे मंत्री व्ही. श्रीनिवास गौड यांच्या हस्ते रेड्डी याला हा पुरस्कार मिळाला होता. 16 ऑगस्ट रोजी महबूबनगर इथे कर्तव्यावर असताना तिरुपतीने रमेश नावाच्या ट्रकचालकाकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. रमेशने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून रेड्डीची तक्रार केली. रमेशच्या तक्रारीनुसार, रेड्डीने पैसे न दिल्यास खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकीही दिली होती.

रमेशच्या तक्रारीवरून विभागाने सापळा रचला आणि त्यानुसार रमेशने रेड्डीला 17 हजार रुपये देण्यासाठी बोलवलं. रेड्डी जेव्हा रमेशकडून पैसे घेत होता, त्याच वेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिरुपतीला रंगेहात पकडलं. पोलीस विभागाकडून आता रेड्डीवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.