
>> जयेंद्र लोंढे, [email protected]
अजूनही आपण क्रिकेटच्याच प्रेमात आहोत. 29 ऑगस्ट आपला क्रीडा दिवस. कुठे आहे आपला राष्ट्रीय खेळ– हॉकी…
29 ऑगस्ट…. हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस… हिंदुस्थानात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ध्यानचंद यांच्या अद्भुत कौशल्याच्या जोरावर हिंदुस्थानच्या हॉकी संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिराज्य गाजवले. 1980नंतर ऑलिम्पिकमध्ये आणि 1975नंतर वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानला एकही पदक पटकावता आलेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई गेम्स, आशिया कप, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी, सुल्तान अझलन शहा कप या स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवण्यात हिंदुस्थानला यश लाभले आहे. आता मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रिड व कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या अधिपत्याखाली हिंदुस्थानी संघ हॉकी विश्वातील बलाढय़ संघांना टक्कर देण्यासाठी सज्ज झालाय.
ऑलिम्पिक, वर्ल्ड कप विजेते कोच
हिंदुस्थानी हॉकी संघाला गेल्या काही वर्षांमध्ये फटका बसलाय प्रशिक्षक बदलांचा. हिंदुस्थानी प्रशिक्षक वारंवार बदलले गेल्यामुळे संघाच्या कामगिरीवरही परिणाम दिसून आलाय. मात्र हॉकी इंडियाकडून यंदा ऑस्ट्रेलियाचे अनुभवी ग्रॅहम रिड यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. ते सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाने 1992 ऑलिम्पिकमध्ये रौप्य, 1990 सालच्या वर्ल्ड कपमध्ये कांस्य पदक आणि चार वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची करामत केलीय. एवढेच नव्हे तर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाने हॉकीच्या टर्फवर उल्लेखनीय कामगिरी केलीय. त्यामुळे हॉकी इंडियाचा हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक ठरू शकतो.
टोकियो ऑलिम्पिक लक्ष्य
हिंदुस्थानच्या हॉकी संघाने 1928 सालापासून 1956 सालापर्यंत सलग सहा ऑलिम्पिक सुवर्ण पदके जिंकत इतिहास रचला होता. हिंदुस्थानची हॉकीमधील हे वर्चस्व 1980 सालापर्यंत कायम होते. मॉस्कोमध्ये अखेरचे ऑलिम्पिक सुवर्ण पटकावणाऱया हिंदुस्थानला गेल्या 39 वर्षांत एकही पदक जिंकता आलेले नाही. आता हिंदुस्थानचा हॉकी संघ 2020 सालामध्ये टोकियो येथे होणाऱया ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करताना दिसेल.
रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी
हिंदुस्थानचा हॉकी संघ जागतिक रँकिंगमध्ये सध्या पाचव्या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर असून बेल्जियमचा संघ दुसऱया स्थानावर आहे. नेदरलॅण्डचा संघ तिसऱया स्थानी, तर अर्जेंटिनाचा संघ चौथ्या स्थानावर आहे. हिंदुस्थानला रँकिंगमध्ये आगेकूच करण्यासाठी आगामी काळात सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
या खेळाडूंकडून अपेक्षा
हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघात गुणवत्ताप्रधान हॉकीपटूंचा समावेश आहे. यामध्ये मनप्रीत सिंग, पी. आर. श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, रुपिंदरपाल सिंग, मनप्रीत सिंग, गुर्जंत सिंग, सिमरनजीत सिंग या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपला सर्वोत्तम प्रयत्न केल्यास हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवता येणार आहे.
नरेंद्र बत्रा यांचे प्रयत्न
हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी असताना नरेंद्र बत्रा यांनी हिंदुस्थानी हॉकीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन आणि हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुख्य पदावर कार्यरत राहिल्यानंतरही त्यांनी हिंदुस्थानातील हॉकीचा स्तर वाढवण्यासाठी योजना आखल्या आहेत. अव्वल दर्जाच्या स्पर्धा हिंदुस्थानात व्हाव्यात, तसेच युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे, गुणवान रेफ्री तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
महिलांचा संघही कात टाकतोय…
हिंदुस्थानच्या पुरुषांनी सुरुवातीच्या काळात हॉकीचे मैदान गाजवले आहे. हिंदुस्थानच्या महिलांना तशी कामगिरी करता आली नसली तरी राष्ट्रकुल क्रीडा, आशियाई गेम्स आणि आशिया कपमध्ये पदक पटकावण्यात हिंदुस्थानी महिला यशस्वी ठरल्या आहेत. हिंदुस्थानच्या महिला संघाला ऑलिम्पिक व वर्ल्ड कपमध्ये पदक जिंकता आलेले नाही. पण 2017 साली आशिया कपमध्ये अजिंक्य होण्याचा मान त्यांनी संपादन केलाय. 2018 साली आशियाई गेम्समध्ये दुसरे स्थानही पटकावले आहे. सध्या हिंदुस्थानचा महिला हॉकी संघ रँकिंगमध्ये दहाव्या स्थानावर आहे. मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन व कर्णधार रानी रामपाल यांचा हिंदुस्थानी संघ पुढल्या काही काळात कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.






















































