>> विद्या कुलकर्णी
कठीण चोचीचे टणक लाकूड पोखरणारे सुतार पक्षी रुपाने अत्यंत देखणे. परमेश्वराने सारे रंग त्यांच्यावर उधळले आहेत.निसर्गाने सर्वच सुतार पक्ष्यांना आकर्षक रंगसंगती बहाल केलेली आहे. सोनेरी पिवळा, लाल, काळा, हिरवा असे रंग तर आढळतातच पण त्यावर ठिपक्यांची, पट्टयांची नक्षीसुद्धा असते.
सोनपाठी सुतार
मी राजस्थानमधील रणथंबोर व जालना जंगलांमध्ये फोटोग्राफीसाठी गेले होते. भर उन्हाळ्याचे दिवस होते. वाघ, बिबटय़ांची वाट बघत असताना दोन्हीही ठिकाणी आम्हाला एखादा सोन्याचा तुकडाच हवेत तरळावा, तसे छोटया सोनपाठी सुतार पक्ष्याचे दर्शन झाले. त्याचे सौन्दर्य पाहून मन अगदी हरखून गेले.
गणेशगुडीमध्ये तर संपूर्ण सोनेरी पाठीचा सुतार पक्षी दिसला. तो तर अधिकच नजरेत भरला.सोनपाठी सुतार पक्ष्यांमध्ये छोटा व मोठा अशा दोन प्रजाती आहेत.छोटा सोनपाठी सुतार पक्ष्यांची पाठीच्या सोनेरी रंगावरून हे नाव पडलेले आहे. मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिक्के असतात. मोठा सोनपाठी सुतार पक्ष्यांची पाठ संपूर्णतः सोनेरी, गळा पांढरा व मान काळी असते. बुडी लाल रंगाची असून शेपटी काळ्या रंगाची असते.
ह्या पक्ष्यांची खासियत म्हणजे त्यांची लांबलचक, धारदार आणि अणुकुचीदार चोच. एखाद्या ओल्या अथवा सुक्या झाडाच्या खोडावर अतिशय वेगाने आघात करत, त्याला छिन्नीने कोरावे तसेकोरूनआतली अळी किंवा किटक लिलया टिपून, ओढून बाहेर काढतात. त्यांची जीभ लांब, चिकट असल्यामुळे खोडाच्या आत लपलेले जीव सुद्धा बाहेर खेचून आणू शकतात. बाहेर आल्यावर पण तो जीव पडू नये म्हणून त्यांना जिभेचा विळखा घालतात. हे पक्षी नेहमी झाडावरच आढळतात.
हे पक्षी टणक खोडावर सतत घाव घालून गोलाकार आकाराचे 2/3 इंची व्यासाचे बीळ तयार करून त्यात नर व मादी जोडीने घरटे बनवतात. मादीने अंडी घातल्यावर, पिल्लांची काळजी ते दोघे मिळून घेतात. घरटयाच्या आत अगदी सुरक्षित असलेल्या या अंडयांचा रंग पांढरा असतो. मादी अंदाजे 2 ते 5 अंडी घालते. ही अंडी साधारणतः दोन आठवडे उबवली जातात आणि त्यानंतर पिल्ले 18 ते 30 दिवस घरटयात राहून स्वतंत्र होतात.
लालसर केशरी पोटाचा सुतार –
नराचा मुकुट लाल रंगाचा असून मादीचा काळ्या रंगाचा असतो. त्यावर ठिपकेदार पांढया रंगाचे नक्षीकाम असते. हे पक्षी आपल्या अणकुचीदार चोचीच्या साहाय्याने झाडाच्या खोडामध्ये छोटे छोटे खड्डे करून आतल्या आळ्या, किडे यांना फस्त करतात. ह्या पक्ष्यांच्या जिभेच्या टोकाला ब्रश असतो त्यामुळे ते वसंत ऋतूत ओल्या खोडातील सालींमधून रस शोषून घेऊ शकतात.
भारतीय उपखंडात हिमालयन पर्वत रांगांमध्ये, दक्षिण-पूर्व आशिया, बांगला देश, भूतान, कंबोडिया, म्यानमार, कोरिया, नेपाळ, थायलंड, व्हिएतनाम देशांमध्ये ह्या पक्ष्यांचे वास्तव्य आहे.
तपकिरी मुकुटाचा सुतार –
वरील तिन्ही सुतार पक्ष्यांच्या तुलनेत तपकिरी मुकुटाचा सुतार ह्या पक्ष्यांचे सौन्दर्य थोडे सौम्य आहे. हे पक्षी भारतीय उपमहाद्वीपच्या प्रादेशिक भागांमध्ये मुख्यत्वे हिमालयाच्या मध्यम उंचीवरील भागात, अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान आणि भूतानमध्ये आढळतात. ह्यांचे खाद्य कीटक व त्यांच्या अळ्या, सुरवंट, बेरी तत्सम वेगवेगळी फळे, भाजीपाला वगैरे असते. ह्या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते जुलै असतो. हे पक्षी वठलेल्या वृक्षावर 2 ते 12 मीटर्स उंचीवर बीळ तयार करून आपले घरटे बनवतात.
हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांच्या पार्श्वभूमीवर तिरंगी मुकुटातील काळ्या मखमली पाठीच्या ह्या पक्ष्यांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही निश्चितच हिमालयात पोहोचाल!!
























































