
डोंबिवलीच्या गजबजलेल्या फडके रोडवरील एका बँकेत घुसलेल्या भामटय़ाने खातेदाराचा नातेवाईक असल्याची थाप मारून कॅशियरला लुटल्याची घटना घडली आहे. खातेदाराच्या नावाने काढलेली लाखोची रोकड घेऊन पसार झालेल्या या भामटय़ाचा छडा लावण्यासाठी क्राइम ब्रँचसह स्थानिक पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
फडके क्रॉस नेहरू रोडला असलेल्या मदन ठाकरे चौकात एचडीएफसी बँकेची शाखा आहे. या शाखेत मधुकर नाईक यांचे खाते आहे. काही कामाकरिता पैसे काढण्यासाठी नाईक शुक्रवारी दुपारच्या सुमारास या बँकेत आले. त्यांनी विड्रॉल फॉर्म भरून कॅश काऊंटरवर जमा केला आणि अनाऊन्स होईपर्यंत ते बँकेत थांबले. दुपारी सवाबारा वाजवण्याच्या सुमारास बँकेत आधीपासूनच घुटमळत असलेल्या एका भामटय़ाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती. इतकेच नाहीतर त्याने शिताफीने नाईक यांचे आपण नातेवाईक असल्याची बतावणी करून दोन लाखांसह पोबारा केला. कॅशियरकडे जाऊन आपण बँकेचे खातेदार नाईक यांच्यासोबत आलो असून वयस्कर असल्याने त्यांची रक्कम ताबडतोब द्या, अशी बतावणी केली. आपल्या नावाची अनाऊन्समेंट न झाल्याने नाईक कॅश काऊंटरवर चौकशीसाठी गेले असता सर्व प्रकाराचा भंडाफोड झाला.



























































