मुरुड काशीद येथे एसटी बस व ट्रॅव्हल्स बसला अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरुड तालुक्यातील काशीद घाट रस्त्यावर उतरणीवर एसटी बस व ट्रॅव्हल्स बसची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी एसटी बसमधील सात ते आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले.

मुरुड डेपोतून एसटी बस (एमएच 14/ बीटी 1879) ही कल्याणकडे प्रवासी घेऊन निघाली होती. काशीद येथील घाट रास्ता चढत असताना वरून हंस ट्रॅव्हल्स बस काशीदकडे उतरत होती. त्यावेळी ट्रॅव्हल्स बसची एसटी बसला मधोमध टक्कर झाली. या अपघातात एसटीतील 7 ते 8 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर मुरुडकडे जाणारी व येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त वाहनांना बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.