
अति आरक्षणामुळे खुल्या वर्गातील (अनारक्षित) गुणवत्ता धारक विद्यार्थी यांचे अतोनात नुकसान होत असून येणारी पिढी नैराश्याच्या दिशेने जात आहे. त्याच बरोबर गुणवत्तेला दुय्यम स्थान मिळत असल्याने राष्ट्राला देखील त्याचा तोटा होत आहे. त्यासाठी ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ चळवळ राज्यभर सुरू असून मंगळवारी बीड येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.
‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत ‘गुणवत्ता वाचवा देश वाचवा’ समितीच्यावतीने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांवर तसेच नागरीकांवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध आंदोलन सुरू आहे. 31 ऑगस्ट 2019 शनिवार रोजी बीड येथे भव्य अशा मूक मोर्चाचे आयोजन बालाजी मंदीर पेठ बीड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड येथे जनाधार यात्रेनिमित्त आले होते. मंगळवारी ‘सेव्ह मिरीट सेव्ह नेशन’ बीड जिल्हा समितीच्यावतीने जालना रोडवर मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी सर्वजन रस्त्याच्या कडेला शांततेच्या मार्गाने उभे होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा सुसाट वेगाने जात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी समिती सदस्य उभे असल्याचे दिसताच त्यांनी स्वत:हून गाडी थांबवून समिती सदस्यांना गाडीकडे बोलवत विविध मागण्यांचे निवेदनही स्वीकारले आणि सत्कारही स्वीकारला. त्याच बरोबर निवेदनावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आरक्षण हे संविधानाप्रमाणे पन्नास टक्क्यापर्यंत असायला पाहिजे. खुल्या प्रवर्गातील लोकांना खुल्या प्रवर्गात व आरक्षित प्रवर्गातील लोकांना आरक्षीत जागेचा लाभ मिळावा, पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षण संपूर्णपणे बंद करण्यात यावे, आर्थिक निकषावर सर्व प्रवर्गातील लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, 26 जानेवारी 2020 रोजी आरक्षणाची मर्यादा संपत आहे. तेव्हा सरकारने याबद्दल श्वेतपत्रिका जारी करून या आरक्षणाचा कितपत फायदा झाला आहे हे जाहीर करावे, या मागण्या करण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारुन सकारात्मकता दर्शवल्याबद्दल समितीच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, नागरिक, समितीचे सदस्य उपस्थित होते.
























































