
नेरळ ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी शनिवारी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजप रिपाईं महायुतीने नेरळमध्ये प्रचाराचा जबरदस्त झंझावात निर्माण केला आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारापुढे विरोधकांचा प्रचार फिका पडला आहे. कर्जत तालुक्यातील नेरळ,ऊमरोली,वाकस,रजपे,टेम्भरे या ग्रामपंचायतींची शनिवारी निवडणूक होत असून या पाचही ग्रामपंचायतींवर भगवा फडकलाच पाहिजे यासाठी महायुतीचे नेते आणि पदाधिकारी गेले काही दिवस प्रचंड मेहनत घेत आहेत. या निवडणुकांचा निकाल 3 सप्टेंबर रोजी लागणार आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी रावजी गोमा शिंगवा हे उभे आहेत. शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे यांनी जातीने नेरळ ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले आहे. कर्जत तालुक्यातील शिवसैनिकांनी महायुतीच्या उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्याचे काम गेल्या काही दिवसांत केले आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे देखील प्रचारात उतरले असून त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले आहे.
नेरळ येथील वाड्या वस्त्यांवर पाण्याचा अभाव असून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना नेरळसाठी आणू असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले आहे. नेरळ येथील धसवाडी, जुम्मापट्टी, आनंदवाडी, कोतवालवाडी अशा विविध ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तेथील स्थानिक युतीच्या कार्यकर्त्यांच्या व नागरिकांच्या घरी भेटीगाठी घेऊन समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

























































