चांगल्या-वाईटाचे भरजरी पदर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रवी पवार

ऑगस्ट महिन्यात -कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिह्यांतील गावांना महापुराचा तडाखा सोसावा लागला. जीवनदायिनी नद्यांनी त्यांचं रौद्ररूप दर्शवलं आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या स्थितीशी सामना करण्यासाठी चहूबाजूंनी मदतीची ओघ सुरू झाला. सांगली, कोल्हापूरच्या पूरस्थितीसाठी ‘मराठी देशा’ या संस्थेच्या माध्यमातून मदत पोहोचवत असताना चांगल्या आणि वाईट अनुभवांचे अनेक पदर उलगडले गेले.

2019 ऑगस्ट महिना कृष्णा, पंचगंगा, कोयनेच्या सुजलाम् सुफलाम् खोऱयात राहणारी गावं कदापि विसरू शकणार नाहीत. शेकडो वर्षांपासूनच्या या जीवनदायिनी नद्या रौद्ररूपात प्रकटल्या आणि होत्याचं नव्हतं करून गेल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला. सांगली, कोल्हापूरच्या पूरस्थितीत ‘मराठी देशा’ संस्थेच्या माध्यमातून आम्हीही मदतीचं शिवधनुष्य उचललं.

‘मराठी देशा’तर्फे गेलेली पहिली मदतीची खेप सांगलीच्या आमनापूर आणि कोल्हापूरच्या गडहिंग्लज या भागात पोच झाली, तर दुसरी मदत मीरजेच्या पुढे थोडय़ाच अंतरावर मानेवाडी- जाधववाडी या वाडय़ांमध्ये. आम्ही मदत साहित्याचा टेम्पो तिकडे वळवला. गावातलं पुराचं पाणी सगळा संसार उघडय़ावर पाडून माघारी परतलेलं. साधारण आठवडाभर घर सोडून गेलेले गावकरी उद्ध्वस्त घरटी परत उभारायला गावात परतलेली. गावच्या जाणत्या मंडळींना हाताशी घेऊन घरोघरी साहित्य वाटप झालं.

गावात फिरताना एक गोष्ट लक्षात आली, हे गाव सीमावादात कर्नाटकात गेलेलं, पण इथली संपूर्ण जनता मराठी भाषिक. कागदोपत्री खुट्टय़ा अशा काही बसल्या की, मराठी भाषिक असूनही गाव कर्नाटकात गेलं. घरातली ढीगभर पुस्तकं भिजल्यामुळं त्यांचा लगदा बाहेर टाकणारे राजाराम माने भेटले. त्यांच्याशी बऱयाच गप्पा झाल्या. ‘‘बाहेर पडलेली पुस्तकं नाहीत साहेब, माझ्या अस्थी आहेत अस्थी’’ असं अगतिक हेत ते बोलत होते. सीमा भागातली चार मराठी भाषिक गावं कशी चुकीनं कर्नाटकात टाकली गेली आणि इकडे मराठी भाषिक असल्यानं आमच्यावर कसा अन्याय होतोय यावर ते कडाडून बोलले. ‘‘असे शंभर पूर पचवू. फक्त आम्हाला महाराष्ट्रात घ्या’’ असं ठळकपणे अधोरेखित करणारे राजाराम माने एक वेगळीच ऊर्जा देऊन गेले.

मानेवाडीनंतर गणेशवाडीतल्या पूरबाधितांसाठी ‘मराठी देशा’च्या वतीनं आपण एक मेडिकल कॅम्प लावला. सकाळी कॅम्प सुरू झाल्यापासून दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत तीनही डॉक्टर मित्रांना सेकंदभरही खाली बसता आलेलं नव्हतं एवढी पूरबाधितांची गर्दी होती. शेवटचे पेशंट तपासून भूक लागल्यानं सगळी औषधं-गोळ्या आवरून आम्ही गाडीत ठेवली. तेवढय़ात एक पांढरा कुर्ता, पायजमा घातलेला आणि कान मुंडाशानं गुंडाळलेला, सर्दीतापानं प्रचंड हैराण असा एक इसम गाडीजवळ आला.

‘‘तुमच्या कॅम्पबद्दल माहिती मिळाली. चार-पाच दिवस कायम पाण्यात असल्यानं छातीत आणि डोक्यात सर्दी बसलीय. प्रचंड त्रास होतोय. काही गोळ्या, औषधं असतील तर द्या’’ अशी त्यांनी डॉक्टरांना मागणी केली.

खरं तर सगळं आवरलं होतं, पण तेवढय़ासाठी त्यांना परत पाठवणं डॉक्टरी पेशाला आणि तिथल्या परिस्थितीला अजिबात शोभणारं नव्हतं. आमच्या डॉक्टर मित्रांनी लगेच सगळी पॅकिंग काढली, त्यांना तपासलं आणि योग्य ती औषधं त्यांना सुपूर्द केली. हात जोडून आभार मानून ते निघाले आणि गावातलाच आम्हाला मदत करणारा एक मित्र धावत आला आणि म्हणाला, ‘‘दादा, हे कोण आहेत माहिती आहे का ?’’

‘‘दादा, हे आमच्या गावचे परंपरागत नावाडी. यांची नाव आहे गावात. या पुरात त्यांनी गावातल्या अनेकांना त्यांच्या नावेतून बाहेर काढलंय. गावात जोवर पूर होता, ते पूर्णवेळ पाण्यातच होते. त्यामुळे एवढे आजारी पडले आहेत.’’

हे सगळं ऐकत हातातली औषधं सांभाळत ते बाजूलाच उभे होते. माणूस एकदम गरीब, कौतुक ऐकण्याची सवय नसलेला. त्यांना बोलतं केलं तेव्हा जी माहिती मिळाली ती अशी. त्यांचं नाव सदाशिव आंबी. ते गावचे नावाडी. त्यांच्याकडे त्यांची वंशपरंपरागत एक नाव आहे, ज्यातून ते गावच्या ज्या लोकांची शेती नदीच्या पलीकडे आहे, त्यांना रोज सकाळी पलीकडं सोडणं आणि संध्याकाळी परत गावात आणण्याचं काम करतात. यात पैशांचा व्यवहार नाही. गावात अजूनही बलुतेदारी आहे. नदी ओलांडण्याच्या बदल्यात गावकरी त्यांच्या शेतात जे पिकतंय त्यातला काही भाग त्यांना देतात. त्यावर सदाशिव आंबी यांचं घर चालतं.

या गावातील कित्येक लोक पुराच्या पाण्यात अडकले. 15-20 हजार लोकसंख्येच्या गावात सदाशिव आंबी यांची एकच नाव. सगळा भार त्यांच्यावर पडला. गावातल्या तरुण पोरांना हाताशी धरून त्यांनी थोडीथोडकी नाही, तर तब्बल 1,500 माणसं आणि 50-100 जनावरं पुरातून बाहेर काढली. गणेशवाडीतली तर सगळी माणसं बाहेर निघाली, पण आजूबाजूच्या गावांत अजून बरेच लोक पुराच्या पाण्यात अडकलेले. कित्येक तर दोन-दोन, तीन-तीन दिवस घरावर जीव मुठीत धरून बसलेले. त्या गावातून सदाशिव आंबी यांना फोन येऊ लागले. गणेशवाडीतली सगळे लोक सुरक्षित स्थळी पोचवून आंबी आजूबाजूच्या गावांत नाव घेऊन मदतीसाठी फिरू लागले. सदाशिव आंबी यांच्या मते गेल्या 35 वर्षांत नदीचं असलं रौद्ररूप त्सांनी याआधी कधी पाहिलं नव्हतं.

या सगळ्यावर मात करत सदाशिव आंबी यांनी त्यांच्या गावची अंदाजे 1,500 तर आसपासच्या गावांतली किमान तीन चारशे माणसं त्यांच्या नावेतून बाहेर काढली. जीव वाचवलेल्या जनावरांची गिनतीच नाही. एवढं मोठं दिव्य करूनही नाव व्हावं, काहीतरी सरकारी मदत मिळावी याचा कसलाही अट्टहास सदाशिव आंबी यांचा नाही. साधारण 2000 जिवांना जीवदान देणाऱया या अवलियाला या माध्यमातून आपण अत्यंत छोटीशी का होईना, मदत देऊ शकलो याचा आनंद आयुष्यभर पुरून उरणार आहे. चांगल्या आणि वाईटाचे सगळे पदर या चार दिवसांत उलगडले. माणूस किती चांगला असू शकतो आणि त्याच वेळी तो किती वाईटही असू शकतो हे सगळं पाहायला मिळालं. आम्ही जेवढी मदत पोच केलीय ती तिथल्या गरजेच्या दृष्टीनं मुंगीएवढीही नाही, पण सुख एवढंच आहे, आपण किमान प्रयत्न करतोय.

बायको फोनवर सांगतेय… घर पडलंय सगळं. आता पडलंच आहे घर तर पाहुण्याच्या घरी जा राहायला. मी पुरात अडकलेल्या लोकांना मदत करतोय म्हणून आठ दिवस घरीच न आलेला कोल्हापूरचा सचिन भोसले भेटला. पुरातून लोकांना बाहेर काढणाऱया पोरांना कमरेभर पाण्यात 100 चकरा मारत जेवायला घालणारी गणेशवाडीतल्या काकू भेटल्या. ‘‘दादा, तुमचा कॅम्प त्या माळावर घ्या. तिथे पूर नव्हता, पण आमची घरं पुरात होती तेव्हा तिथल्या लोकांनीच आम्हाला आणि आमच्या जनावरांना सांभाळलं असं सांगणारी तरुण पोरं भेटली. सगळं गाव मदत मिळावी म्हणून भांडत असताना लांब थांबून मदतीकडं आशाळभूत नजरेनं टेम्पोकडे पाहणारे शेकडो चेहरे पाहिले. आमच्याकडं आमचं अजून शिल्लक आहे. तेव्हा ही मदत ज्यांना गरज आहे त्यांना द्या असं सांगणारेही भेटले.

त्याच वेळी पूरबाधित लोक घरातला गाळ काढत असताना मदतीच्या रांगेत झोंबाझोबी करणारे तिऱहाईत पाहिले. पूरबाधित भागात जाणारा टेम्पो गर्दीच्या जोरावर गावात अडवून तो लुटणारेही पाहिले. स्वतःच्या तुंबडय़ा भरणारे स्थानिक गुंडधेंडं पाहिली, जमलेल्या मदतीवर विनाकारण गावजेवण घालणारे महाभाग पाहिले. कसलाही सर्व्हे न करता जमलेली मदत वाटेल तिथं नेऊन गाडय़ा मोकळ्या करणारे, पूरबाधितांच्या नावाने पैसे उकळणारे आणि या स्थितीतही हिरोइझम शोधणारे नाकर्ते पाहिले.

समृद्ध करणारं आणि त्याच वेळी हताश करणारं सगळं पाहायला मिळालं. पुराच्या तडाख्यात जे जे सापडले ते सगळे किमान एक पिढी मागे गेले आहेत. न्यूज चॅनेल्सवरचा पूर कधीचाच ओसरलाय. लोकांना वाटायला लागलंय भरघोस मदत पोचलीय, सगळं परत सुजलाम् सुफलाम् झालंय, पण वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. पुढचे वर्ष सहा महिने त्या भागात भरीव काम करावं लागणार आहे. मदत पोहोचवणाऱयांना मात्र विनंती आहे की तीच तीच मदत आणि त्याच त्याच ठिकाणी पाठवणं टाळा. त्या भागातल्या प्रत्येक गावाची, कुटुंबाची, माणसाची गरज वेगळी आहे. तेव्हा समजून उमजून मदतीचा ओघ सुरू ठेवावा लागणार आहे.

– [email protected]