वृक्ष प्राधिकरणातील वनस्पतीतज्ञ शशिरेखा सुरेशकुमार यांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
save-aarey-movement

 ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात येणार्‍या झाडांसंबंधात तब्बल 30 हेक्टर जागेची पाहणी करण्यासाठी केवळ तीन व्हिजिट घेण्यात आल्या. शिवाय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या  बैठकीत बोलायची संधीही देण्यात आली नाही. याच वेळी झालेल्या प्रचंड गोंधळात चुकीच्या बाजूने मतदान झाल्याची कबुली देत वनस्पतीतज्ञ शशिरेखा सुरेशकुमार यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा उद्यान अधीक्षकांकडे दिला.

‘मेट्रो-3’च्या कारशेडसाठी गोरगाव पूर्व ‘आरे’तील तब्बल 2702 झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील 2238 झाडे तोडण्यात येणार असून 464 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. मात्र राज्य शासनाने नेमलेल्या ‘त्रिसदस्यीय  समिती’ने कांजूरमार्ग येथील पर्यायी जागा सुचवली असताना आरेतील झाडे तोडण्याचा अट्टहास का धरला जात आहे असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला हानी पोहचू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत तीनही वनस्पतीतज्ञांनी झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केल्याने हा प्रस्ताव ‘6 विरुद्ध 8’ अशा मतदाने मंजूर झाला. झाडे वाचवण्याची जबाबदारी असलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशाने नियुक्ती झालेल्या वनस्पतीतज्ञांनीच झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केल्यामुळे त्यांच्यावर लाखो रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर स्पष्टीकरण देताना वनस्पतीतज्ञ शशिरेखा सुरेशकुमार यांनी आपली भूमिका मांडताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे सांगितले. दरम्यान, शशिरेखा यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली बाजू मांडली तरच त्यांच्यावरील आरोप पुसले जातील असे मत व्यक्त केले जात आहे.

…म्हणूनच दिला राजीनामा

आपण एक शिक्षिका असून गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणसंवर्धन, संरक्षण आणि झाडे वाचवण्यासाठी काम करीत होते. त्यामुळे पैसे घेऊन झाडे तोडण्याचा केलेला आरोप निरर्थक आहे. या आरोपामुळे आपली नाहक बदनामी झाली आहे. त्यामुळेच आपण राजीनामा दिल्याचे शशिरेखा  सुरेशकुमार यांनी सांगितले. इतका महत्त्वाचा विषय असताना आपल्याला  मत व्यक्त करण्याची पुरेशी संधीच देण्यात आली नाही.  यावेळी सदस्यांकडून जोरदार आवाज सुरू होता. त्यामुळे प्रस्तावावर नेमक्या कोणत्या बाजूने मतदान होतेय हेदेखील समजले नाही. मात्र आपल्या दोन सहकारी वनस्पतीतज्ञांनी मतदानासाठी हात वर केल्यामुळे त्यांचाही निर्णय योग्य असेल या भावनेतून आपण मतदान केल्याचा खुलासाही त्यांनी केला. ज्या कामासाठी आपली नियुक्ती झाली ते काम जर करू दिले जात नसेल तर या पदावर राहून अर्थ नसल्यामुळेच आपण राजीनामा दिल्याचे त्या म्हणाल्या.