
पालिका शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना 27 शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यात कंत्राटदारांचा हलगर्जीपणा कायम आहे. चार महिन्यांनंतरही गणवेशासह इतर साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेले नाही. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत या वस्तूंचा पुरवठा झाला नाही तर संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशारा शिक्षण समिती अध्यक्षांनी दिला.
गेल्या दोन वर्षांपासून शाळेच्या पहिल्या दिवशी या सर्व वस्तू मुलांपर्यंत पोहचल्या होत्या. मात्र यंदा शाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी या वस्तू मुलांपर्यंत पोहचल्या नाहीत.
पालिका शिक्षण समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. येत्या 5 सप्टेंबरपर्यंत शालेय वस्तू मुलांपर्यंत पोहचल्या नाहीत तर संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले जाईल. संबंधित अधिकार्यांवरही कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी दिला. शिवसेना नगरसेवक मंगेश सातमकर यांनी विद्यार्थ्यांना वस्तू देण्यात आगामी विधानसभा निवडणूक आचारसंहिता अडचण ठरू नये असे सांगत या वस्तूंचा पुरवठा लवकर करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नगरसेवकांनीही या मुद्दय़ावर प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर आतापर्यंत 61 टक्के वस्तूंचा पुरवठा विविध शाळांमध्ये करण्यात आला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व वस्तूंचा पुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले.


























































