
शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाचा वीज पुरवठा बारा-बारा तास खंडित होत असल्याने तो सुरळीत करावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी विद्युत मंडळाच्या सेनगाव येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सेनगाव शहरातील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. ग्रामीण भागाची स्थितीही अत्यंत बिकट असून दिवसा व रात्रीही वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली विद्युत मंडळाचे कर्मचारी बारा-बारा तास विद्युत पुरवठा खंडीत करत आहेत. कुठेही लोडशेडिग नसताना सेनगाव शहरासह तालुक्यातील विविध गावामध्ये विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. तक्रार केल्यास विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. सणासुदीचे दिवस असून सेनगावात रविवारी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि रात्रभर विद्युत पुरवठा सुरू झाला नाही.
सोमवारी सकाळी 11 वाजता हा विद्युत पुरवठा सुरू झाल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या सेनगाव येथील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. सेनगाव शहरासह ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली बंद न करता सेनगाव शहराला येथील 132 के.व्ही. रोहित्रावरून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण महाजन, शहराध्यक्ष जगनाथ देशमुख, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष शैलेश तोष्णीवाल, युवासेना तालुकाध्यक्ष जगदीश गाढवे पाटील, नगरसेवक मंगेश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता जाधव यांनी दूरध्वनीवरुन आंदोलकांशी संवाद साधून मागण्यांचा सकारात्मक विचार करून यापुढे विद्युत पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
























































