
लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पश्चिमकडेल 4 किलोमिटर अंतरावरील आदित्यांगन सोसायटीमध्ये बंद घर चोरट्यांनी फोडले. सोन्या-चांदीचे दागीने असा सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांच्या ऐवजासह परिसरातील 2 दुचाकींची चोरी केली. सदर चोरी प्रकरणी विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात संतोष शिवाजीअप्पा रेशमे (रा. आदित्यांगन सोसायटी, लातूर) यांनी तक्रार दाखल केली.
फिर्यादी हे आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर पाहून घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. खोलीतील कपाटाचे कुलूप तोडले आणि कपाटातल सोन्याचे 6 तोळ्याचे दागिने (किंमत 1 लाख 20 हजार रुपये), 1 किलो चांदीच्या वस्तू (किंमत 40 हजार रुपये) असा ऐवज चोरुन नेला.
चोरी करुन जात असताना फिर्यादींच्या घराच्या शेजारी राहणारे शिवाजी पाटील यांची स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.24 वाय 5553) आणि राजेंद्र औरादे यांची पॅशन प्रो मोटारसायकल (क्रमांक एम.एच.24 झेड 1998) चोरुन त्या मोटारसायकलवरुन पळून गेले. चोरट्यांनी एकूण 2 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एच.पाटील हे करीत आहेत.






























































